आँयस्टर/कालवं

 




आँयस्टर/कालवं

मराठी ४थीत असल्यापासून, मी समुद्रावर मासेमारी साठी जात असे. खरं नाही ना वाटत ? सांगते.... 

माझी चुलत बहीण आम्ही तिला 'बायजी' म्हणत असू ती शनिवार, रविवारी भरती ओहोटीची वेळ पाहून आम्हा समवयस्क मुलांना  समुद्रावर कालवं(oysters) फोडायला, खुबर्या, खुबे(shell) चिंबोरी(crabs) पकडायला घेवून  जात असे. जाताना खरळ(एक प्रकारचा गवत कापायचा कोयता, ज्याच टोक धारदार असते व तो वजनाने हलका असतो. )तांब्या भरून पाणी, लिंबाच्या गोळ्या, बरोबर घ्यायच्या भर दुपारचे उन ,वार्यामुळे जाणवत नसे, पण तहान लागत असे म्हणून भरलेला लोटा, सर्वाकडील पाणी संपले की लिमलेटच्या गोळ्या तेव्हा १० पैशाला ८ किंवा मोठ्या २ मिळत. हे सर्व ठेवायला एक कापडी पिशवी. प्रत्येक जण समुद्रावर जाण्यापूर्वी  ही सामुग्री गोळा करत असत. ओहोटीमुळे पार समुद्रात मोठाले खडक उघडे पडलेले असत, व कपारीत वरील समुद्र धन दडलेले असे. प्रत्येकजण एकेक खडकाचा ताबा घेत असे. कपारातील खुबर्या, पालक, छोटे खेकडे, रंगीत शिंपल्या आकर्षक दगड गोटे जे मिळेल ते वेचायचे, खुबे मात्र चिखलात हात घालून शोधावे लागत, त्यामूळे ते फारसे मिळत नसतं. मी तशी सर्वात लहान होते.  नीट खरळ कसा मारायचा, हे शिकवलेले, तरी मला वेग नव्हता, पण खुबर्या, पालक वेचण्यात पटाईत होते. साधारण २-३तास झाले की सर्वांचे पाण्याचे रिकामे तांबे कालवाने भरत, बायजी माझा लोटा पहायला येत असे. सर्वजण दूरवर जात पण बायजी मला तिच्या किंवा इतर मुलींच्या आजूबाजूला च रहायला सांगत असे. सर्वांच्या लिंबाच्या गोळ्या संपलेल्या असल्या तरी तिच्याकडे अजून शिल्लक असत ती त्यातील मध्येच मला देई. माझा तांब्या निम्मा पण झालेला नसे, मग मला ती भरभर फोडून देत असे. इतर मुली सांगत बायजी चला सर्वांचे तांबे भरले, मग ती म्हणे- असं कसं एवढ्या लांब उन्हात मी तिला घेवून आले, आणि तिला थोडी सूद्धा कालवे मिळाली नाहीत. तर तिची आई उद्या पाठवेल का बरोबर? मग इतर सर्व खुबर्या टिपत,व ती मला कालवं फोडून देई. पूर्ण पाण्यापर्यंत आत(लांनघी) जाळ्यात मासे पकडायला गेलेली माणसं परतत असत व भारतीला सुरूवात झाली, माघारी वळा कधी पाणी खडकापर्यत पोहचेल व माघारी फिरायचे वांदे होतील कळणार नाहीत. म्हणून समज देत. मग मात्र आम्ही घाईघाईने परत फिरत असू. माझा एकटीचा अर्धा तांब्या असे, बाकी सगळ्यांचे भरलेले, पण माझ्याकडे इतरांपेक्षा जास्त खुबर्या असत. माझी आई ते सर्व पाहील्यावर खूश होत असे. अंगाला रेती, खारे पाणी चिकटपणा पाहून आई आगोदरच गरम करून ठेवलेले पाणी अंघोळ करायला देत असे. एवढ्याश्या कालवातही माझी आई आनंदी होत असे. ती माझे मनापासून कौतुक करे.गंमत म्हणजे मी इयत्ता ६वीत जाईपर्यंत मासांहार करत नव्हती. पण ते पकडायला जायची भारी हौस. म्हणूनच माझी आई माझे कौतुक करे. तसे संध्याकाळी ओहोटी असली की मोठा भाऊ बरोबर घेवून गावातील अशाच ४-५ आईच्या मैत्रीणी बरोबर आई ,कालवं/खुबर्या आणायला जात असे, व रात्री परतत असे. तेव्हा मात्र आम्हा लहानांना मनाई असे. आम्ही इतर मोठ्या बरोबर घरीच थांबू. 

                    गंमत म्हणजे माझ्या मामाकडे माझे मामा, मावशी नेहमी आसू(मच्छी पकडायची 🏀🏦जाळी) घेवून ताजे मासे घेवून येत. ज्या वेळी माझ्या माव़़शीच लग्न जमलं तेव्हा तिला पहायला आलेले पाहुणे आले तेव्हा ती मासे पकडायची जाळी तशीच पाठीवर घेवून  त्यांच्या समोरच घरात आली. तिला अचानक आलेले पाहुणे कोण आहेत हे देखिल माहीत नव्हते. असो. 

समुद्र किनार्यावर रहात असल्यामुळे ताजे मासे हे आमचे आवडते खाद्य होते. मामाकडे रहायला गेल्यावर, गरी घेवून त्याच्या टोकाला सूकी मच्छी लावून धक्क्यावर मासे गरवत बसायचो. अर्थात बरोबर मामाची मुल, गावातली मुलं असतं, खूप मासे अगदी हताजञळ येतं. पण दोरीला जो हिसका द्यायचा असे तो आम्हाला देता येत नसे, त्यामुळे मासे वर खेचेपर्यत गरीला लावलेली मच्छी संपत असे, व अर्ध्यापर्यत आलेली मासळी परत पाण्यात पडत असे. उन्हातान्हात, संध्याकाळ पर्यत आम्ही असे उद्योग करत असू आणि संध्याकाळी रिकाम्या हाताने घरी परतत असू. ( ह्यात टोळ नावाची मच्छी खूप सापडत असे व ती माझी नंतर आवडती मच्छी झाली होती.) गावातील मुल मात्र डबा भर  ताजी जिंवत मासळी पकडून नेत असतं. जाताना थोडेसे मासे आम् च्या साठी देवून जात. मामा मात्र संध्याकाळी मासे घेवून येत असे. या खेळण्यात मला त्यामूळे माशाचे वेगवेगळे प्रकार मात्र सहज ओळखता येवू लागले. 

 दोन वर्षांपूर्वी धक्क्यावर( टोळ माश्याचा मोठा प्रकार) त्यातलाच हातभर लांब हरेल मासा, मला श्रावण महिन्यात (उपवासात) एका कोळीणीने ३००रू ला देते . घेतेस का ?विचारले. माझे बालपण मला परत मिळते म्हटल्यावर मी महिनाभर उपवास सोडून तो मासा घेतला. व डीप फ्रिज मध्ये साफ करून ठेवून महिनाभर खाल्ला. मी मासे फार क्वचित खाते. त्यामूळे बालपणातील माझी मी माझ्यात किती आहे. खाण्यापेक्षा ते पकडणे, पाहणे, ह्यात गंमत वाटते.  खूपशा गोष्टी पून्हा पून्हा बालपणात फिरवून आणतात. लाँचमधून येताना धक्यावर अशीच मुल गरी टाकून मासे पकडत असताना आपलेच बालपण आपणच पाहतोय असं वाटून नकळत चेहर्यावर हसू उमटते तेही मोलाचं नाही का?...... 


समाप्त 

वर्षा पाटील. ©

बी. एस. सी.

(डी. एम. एल. टी.) 

उरण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4