भूत भाग : १
भूत :भाग १
पावसाळ्यात गावात दाट गर्द झाडी, किर्रर काळोख रस्त्यावर ठरावीक अंतरावर विजेचा खांब त्यावर पिवळा प्रकाश देणारा बल्ब १५ फुटापर्यंत त्याचा पसरलेला प्रकाश आणि परत तसाच पसरलेला किर्रर...काळोखआणि त्या काळोखात मिणमिणता उजेड घेवून थव्याने उडणारे काजवे कडेच्या शेतातून आेरडणारे रातकिडे, चिखलातून ओरडणारे बेडूक, रस्त्यावरून झोकांड्या देत जाणारा एखादा दारूड्या ....
तोच दारूड्या दारू उतरल्यावर दुसर्या दिवशी गावच्या पारापाशी गावातील टवाळ मुल घेवून रात्री दिसलेल्या चेटकीणीचे , हडळीचे, भुताचे वर्णन सांगत असे , हातभर बागड्या , पायात घुंगरूले पैजण, कपाळावर मोठाले कुंकू, पांढरी शुभ्र साडी नेसून खुणेने बोलवणारी स्त्री त्याने तिच्या पायाकडे पाहीले तिचे उलटे पाय पाहून त्याची दारू पूर्ण उतरून गेली, मग तो स्वत: धूम ठोकून कसा पळाला. त्या दारूड्याची ती गोष्ट मग ती टवाळखोर मुल मीठ मसाला लावून घरोघरी सांगत असत काहीजण तर त्या बाईने त्याला झपाटले इथपर्यंत ती कथा रंगवून सांगत. भूतांच्या कथा भीतीदायक असल्या तरी त्या ऐकायला खूप गंमत वाटते. भीतीने एकमेकांचे हात घट्ट पकडून ठेवायचे व गोष्ट संपेपर्यंत कान टवकारून व श्वास रोखून ऐकत रहायचे. आमच्या लहान पणी किंबहुना सर्वाच्या लहानपणी थोड्याफार फरकाने अशाच भुताच्या कथा कुणी नाही कुणी सांगत असे.
उन्हाळ्यात शहरातील नोकरधारी मंडळी गावाकडे सुट्टी घालवायला येत. मग रात्री जेवण झाली की अंगणात बाज टाकून(लाकडी काँट) एकत्र गप्पा मारत बसत. गावात(कोकणात) गप्पा रंगल्या की हळूहळू गाडी भूतांच्या गप्पा वर उतरत असे आणि एक संपला की दूसरा असं एकेक जण आपापले अनुभव कथन करत असतं.... काहींचे अनुभव इतके भयानक की भितीने तोंडातून शब्द ही फूट नसे. ते अर्थात किती खरे किती खोटे की निव्वळ थापा ते सांगणार् यालाच माहीत. पण चकवा, हा जवळ जवळ प्रत्येकाचा अनुभव असेल. आता तुम्ही म्हणाल ह्यात काय लिहायचं तर काही लोक ही त्याच्या मुळापर्यंत जावून शोध घेतात. व ती शूर तर असतातच. पण दुसर् यांची भीतीही घालवतात.
आता मीही इथे माझ्या लहानपणापासून चे खरे अनुभव सांगणार आहे. ते भूतांचे प्रकार होते की आभासी प्रतिमा हे मी नाही सांगू शकत......
मी मराठी ३रीत होते मधली सुट्टी संपत आली आणि अचानक आमच्या वर्गातील मुल झाडावर भूत भूत ओरडली. प्रथम भीती वाटली मग लगेच भूत पहायला मिळालेली संधी कशी सोडायची म्हणून वर्गातील मुलाबरोबर मीही भूत पहायला गेले. मोठ्या अवाढव्य चिंचेच्या झाडावर भूत पाठमोरी बसले होते. केस लांबसडक मोकळे सोडलेले, चाॅकलेटी रंगाची फुलांची पायघोळ साडी उंचावरले इतकेच दिसत होते. पाय उलटे दिसतात का ते मी पहायचा प्रयत्न करत होते. कारण मला आठवत मी कुठेतरी ऐकलं होतं भूतांचे पाय उलटे असतात म्हणून. बाकी चेहरा वैगरे काही दिसत नव्हते. मधली सुट्टी संपली आमच्या वर्गाची मोठाली खिडकी शाळेच्या मागच्या बाजूला उघडत होती. व ते चिंचेचे झाड बरोबर दिसत होते.मग ते झाडावरचे भूत निदान त्याचे पाय तरी खिडकीतून दिसतात का पहात होतो. शाळा सुटे पर्यत बाईंची नजर चुकवून आम्ही हेच करत होतो. शाळा सुटल्यावर त्याच मागच्या शेतातून माझ्या घरी जायची वाट मी सारखी वर पाहून चालत होते ,मला पक्के ते भूत तसेच झाडावर बसलेले दिसत होते. काहींना तर दिसतही नव्हते...
घरी आल्यावर आमची आई घरात नसे ती शेतावरून सहा नंतर येत असे. उन्हाळ्यात ही तण काढणे. राब करणे ही शेतीची काम असतं,मी चहा पिताना आजीला सर्व गोष्ट सांगितली. तिने मला सांगितलं आमची सर्वात मोठी आत्या (आता हायात नाही) तीला मुलबाळ नव्हतं पण तीने तिच्या पुतण्या़ंचा सांभाळ केला. सर्वात मोठी गुलाब तिला लहान मुलगी असताना तिच्या नवर्याने सोडले. तिचे सासर व माहेर उरणचेच नवरा मुंबई ला नोकरीवर असे. ती ची मुलगी व सासरचे शाळेच्या पूढील गावात रहात असतं ती सासरी आली की तीचे सासरचे तिला घालवून देत मग ती शाळेजवळ येवून थांबत असे कुणी पाहू नये म्हणून झाडावर बसून रहात असे.ती एवढ्या मोठ्या कठीण झाडावर कशी चढत असे देवच जाणे. तिची मुलगी माझ्याच वर्गात होती. ती लांबूनच आपली मुलगी पहायला येत असे लहान असताना आणल्यामुळे ती आईला ओळखत नसे. ही गोष्ट ऐकल्यावर मला वाईट वाटले कारण ते कदाचित भूत नसेल पण माझ्या नात्यातीलच एक बाईचे रूप होते. पून्हा तिची मुलगी माझ्याच वर्गात होती. आधीच तिला आई नाही म्हणून आम्ही तिच्याकडे केविलवाण्या नजरेतून पहात असू.दुसऱ्या दिवशीपासून ते भूत नसून त्यामूलीची आई होती. हे तिच्या मैत्रीणीत फक्त मला ठावूक झाले.मी त्या मुलीशी मैत्री केली. एकदा तर मधल्या सू्ट्टीत तिच्या घरी जावून आले. ती दया होती. किंवा आपलेपणा सांगता येत नाही. पण ती तिची आई नसून भूत असेल आणि आजीने माझी समजूत काढली असेल तर.....
मी कित्येक दिवस घाबरत असे. एकदा मागच्या दारात आजीबरेबर असताना ,आजीने पूढील सर्व दारे खिडक्या लावली होती. व घरात अंधार होता. पोस्टमन पत्र घेवून आला. त्याने हाका मारल्या, दार ठोठावले आजी चुलीवर काही करत होती.ती उठून जावू शकत नव्हती.पण मी घरातून किंवा बाहेरून पुढच्या दारात जायला तयार होईना......
सर्व काम झाल्यावर आजीने पुढचे दार उघडून पाहिले तर दारात पत्र टाकलेले होते....
रात्री दोन्ही भावाने एक एक घराभोवती फेरी मारली. व मला सांगितले कुणीही नाही आता तू मारून बघ. धाडस करून मीही फेरी मारली . घरातले सर्व त्याच्यावर ओरडले. भितीने आजारी पडली तर,मग, ? पण माझी भिती पळून गेली...
क्रमश:भाग १
वर्षा प्र पाटील. ©®
९८१९४०६८१३
उरण
७/८/२०२०
६:२२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा