रानमेवा

रानमेवा

शालेय जीवनात २री, ३रीत आम्हाला एक कविता होती.                  वडाच्या पारंब्या लोंबतात लोंबतात

'               'त्यावर झोपाळे झुलतात, झुलतात. '

खरच त्यावेळी आम्ही शाळा सुटली, की कपडे बदलून माकडांच्या सारखे वडाच्या पांरब्यावर झोके घ्यायला जायचो. पारंब्या घट्ट पकडून हात लाल व्हायचे.वडाच्या झाडावर चढायचो.  उंबर, भोकरे फळे खायचो,गावात शनिवार रविवार एकही मुलगा घरात सापडणार नाही. असे गावभर हिंडण्याचे आमचे खेळ असायचे. गाव लहान शेतकरी समाजाचा, पण मुलगा मुलगी भेद नाही. मस्ती मुलांवरून घरी भांडण नाही. दिवस दिवस खेळायचो. लहान भांवडाना ,संवगड्याना खेळताना सांभाळाचो. राज्ंणाच्या झाडावर चढायचो. व पिवळी धम्मक रांजणे हाताने तोडून खायचो. हाताला जाम चिक लागायचा. आता रांजणाच्या गाडीवर रांजणाच्या भाव विचारल्यावर रांजणाला हात लावायला पूढे सरावलेला हात भाव ऐकून शाँक लागल्यासारखा झटकन मागे येतो. पिकलेली गोड उंबर, भोकर आणि अंजीर यात कितीसा फरक .... 

करवंदाच्या जाळ्या धुंडाळायचो, कच्ची करवंद आंबट गोड चटणी साठी, आणि पिक्की, काळी  करवंद कोंबडा, की कोंबडी खेळ खेळताना खाण्यासाठी.... 

प्रत्येकाच्या दारात आंब्याच्या वाड्या पण आंब्याचे प्रकार जाती,  चवी वेगळ्या , तेव्हा एकत्र येवून खूप सारे आंबे देवाण घेवाण करून एकत्र मीठ मसाले लावून चवीने खाल्लेले. प्रकार तरी किती.. बाटली, खोबरी, हापूस, पायरी, काजू, लंगडा इ. 

एकदा एका शेजारील मैत्रीणीने शाळेतून येताना मला आमच्या मालव्यात यंदा नवालकोल आणि, बीट लावलेत. तू तूमच्या घरचे दोन मोठे आंबे आण, मग मी तुला बीट व नवालकोल देईन सांगितले. घरी जावून दप्तर टाकले घराच्या मागच्या पत्र्यावरून घरावर चढले ,कौलावर लोंबकळणारे दोन मोठाले आंबे देठासकट तोडले. व मैत्रिणीच्या घरी धूम ठोकली. तिला आंबे देवून तिच्या बरोबर माळव्यात गेले तिथे खूप सारी गाजराची अस्टरची  फूले,फुललेली, मोटीला जोडलेली बैलांची जोडी, छोट्या छोट्या वाटेने सोडलेले पाणी, आणि उन्हाळ्यात अंगाला  जाणवणारा गारवा, तिने सांगितल्या प्रमाणे थोडीसी फूले मोठाले एक ,एक नवालकोल व बीट  शेतात काम करणार्या तिच्या काकांकडून खणून मागितले, व मला दिले.बालपणाची  ती मैत्री, तो विश्वास ते प्रेम आयुष्यात नंतर कधीच मिळत नाही. मिळतात ते रूक्ष व्यवहार, विषारी डंख, पंधरवड्यी पूर्वी कोरोना काळात मी भाजी आणायला गेली माझ्या पूढे एक माणूस भाजी विकत घेत होता. मी रेंगाळली  त्या माणसाने भाजी घेतली व वळला चेहर्याला मास्क लावलेला त्यामूळे चेहरा ओझरता दिसला कुठे पाहीला आठवू लागले दोन तिन मिनटे लागली. आमच्या शेजारच्या मळेवाल्या मैत्रीणीचा तो भाउ होता. मळ्यात भाजी पिकवणारा भाजी बिहार्याकडून विकत घेताना पाहून कसचंच वाटलं , त्याही पेक्षा आपल्याच शेजार् याला, घरच्यांना आपण कसे अनोळखी होतो. हे पाहून दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव.... 

 गावात प्रत्येकाच्या दारादारात परसात चिंचेचे झाड त्याला लगडलेले कच्चे हिरवे आकडे(अकोले) दगड मारून त्या कोवळ्या चिंचा पाडायच्या  विहिरीवर थंड पाण्यात धुवायच्या आणि मीठ व मसाल्यात बुडवून खायच्या,.. 

त्या पूर्ण मोठ्या झाल्या ,चिंचोके तयार झाले की त्यांची पिकण्याची प्रक्रिया सुरू व्हायची त्या गुरूमटलेल्या चिंचा  वार्याबरोबर खाली पडायच्या मधल्या सुट्टीत त्या टीपायच्या व खिशात कोंबायच्या  जाता येता टरफल फोडून खायच्या चिंचोके मैत्रीणींना किंवा आजीला भाजायला द्यायचे... 

पारले चाॅकलेट, किंवा इतर चाॅकलेटांची कव्हर छान वास येतो, म्हणून किंवा बाहुली बनवायची म्हणून पुस्तकात ठेवायचो. मी माझी लहान चुलत ३ वर्षाची बहीण शाळेतून आली की चाॅकलेट विचारायची. मी तिच्या हून साधारण ३- ४ वर्ष मोठी मी गुरूमटलेल्या चिंचेची शेड व चिंचोका काढून रँपर मध्ये गुंडाळून द्यायची. एकदा काकीने ते पाहिले व तिला तोंडातून चाॅकलेट दाखवायला सांगितले व तूला चिंच खायला कुणी दिली विचारले तिने हे चाॅकलेट आहे व वर्षा ताईने दिले सांगितले. व माझी चोरी पकडली. मग मीच तिला चिंचेच्या झाडाखाली नेवून हिरवी अर्धवट पिकलेली गुरमटलेली चिंच दाखवली.  चिंच पिकली की वरच्या टरफलातून मोकळी होते व सुटण्यास सुरूवात होते व आतील रंगही चाँकलेटी होतो. मग चिंच पाडणारा बोलवून ती फांद्या  हलवून, पाडून ,वेचली जाते. मग त्याची टरफले फोडून त्यातील बी विळीवर काढून (काटळणे)मग त्याच्यात मीठ भरून त्याचे गोळे वर्षभर भरून ठेवतात. हे काम कमीतकमी १ महिना प्रत्येक गावातील घरात चालते. महिनाभर घरभर आंबट वास दरवळत राहतो. व त्याचा अंमल चढून झोपही येते.असे,काम करण्यात आनंदही मिळतो. आम्ही ही गंमत म्हणून करायचो. 

 कच्ची पपईच्या बारीक फोडी करून त्यात चिंच मीठ मसाला टाकून कोशींबीरही खूप छान लागते. हाताला लागणारी ही फळे दुपारची भूक आईकडे कसलाही हट्ट न करता छान भागवत असतं. तिच गत पक्क्या पपई ची, मे महिन्यात झाडावर चढून सिताफळाची डोळे व त्यातील रेषा पाहून ते कोवळे आहेत की  तयार झालेले ओळखायचे व तांदळाच्या राशीत पिकायला ठेवायचे, काही झाडावरच पिकलेले हुडकून काढायचे.व खायचे. तिच गत रामफळ, मामफळाची, रामफळातचे झाड विहीरी शेजारी. पिकलेले फळ विहीरीत पडले की फूटायचे व माश्यांना खाद्य मिळायचे . ते लाल रंगाचे झाले की झाडावरून उतरवून पिकायला ठेवायचे. अतिशय मधूर रवाळ व नावामुळे सात्विक. 

पेरू पोपटा प्रमाणे पिकलेला शोधून खायचा अगदीच नाही मिळाला तर खागडाही गोड लागायचा फक्त त्याच्या बिया दातात रूतायच्या व हाताला बी काढायचा चाळा लागायचा. 

चिकूचे झाड त्याच्या फांद्या हातानी झोपाळा करण्यासाठी, किंवा दोरीचा झोपाळा बांधण्यासाठी. त्यावेळी झाडाला वेदना होत असतील हे विचारही मनाला शिवत नसतं. मोठाले चिकू काढून पिकत घालायचे. घरी चिकूचे झाड असले तरी गावात एक आजी रहायची तिचा मुलगा नातवंडे मुंबईत असायची. चिकू झाले की ती बाजारात विकायला द्यायची. आमच्या घरी दरवर्षी पांढरी पिशवी भरून पिकलेले चिकू आणायची. कच्चे चिकू कधीच दिले नाहीत. अतिशय गोड. प्रेमाची भेट.... 

विहीरीचे पाणी वाहून पाणथळ जागा तयार झालेली तिच्या शेजारी देव केळी, केळीचे बन तयार झालेले व अर्धवट केळी पिकली की तिचे घड उतरवयाचे..... 

फणसाच्या झाडाचे फणस गळू नयेत म्हणून त्याला कायम चप्पल बांधलेली असायची गळलेले छोटे फणस गोळा करून त्याची भाजी बनवायची..... 

मोठे फणस कापणे हा सोहळा..

सर्वानी कापणार्या माणसाभोवती गोल बसायचं मग पेल्यात तेल घेवून सुरीला लावायचं व कापला की पिवळे धम्मक गरे काढून टोपात ठेवायचे, बिया वेगळ्या काढून त्या उकडून, भाजीत ,कालवणात टाकायच्या. 

थंडी सुरू झाली की बोर पिकू लागायची थंडीत लवकर उजेडत नसायचं, मग लवकरच काळोखात बोर टिपायला उठायचं आंबट बोर लहान चिनूशी गोड बोर, सफरचंद च्या आकाराची बोर, अहमदाबादी मोठी बोर , कपाटात मोठाले खण भरून साठवायचो. खारवायचो. सुकवायचो.इतकी बोर असूनही शाळेतून मैत्रीणी कडे बोर आणायला जायचो. 

मे महिन्यात जांभळाचा फूलांसारखा सडा पडायचा स्कर्ट मध्ये गोळा करताना त्याचा पार रंग बदलून जायचा. जीभ निळीशार होवून जायची. खावून पोट भरायचे पण मन भरायचे नाही. त्यावर विहीरीचे थंडगार पाणी प्यायचे. 

         एकदा खूप जोरदार पाऊस पडत होता। विजा चमकत होत्या,ढग गडगडत होते. एक आजी मोठी टोपली भरून जांभळ घेवून आली. मला म्हणाली. पोरीसाठी थोडीतरी घे. तुझ्याकडे पहिल्यांदा घेवून आले तूझ्या हातची बोनी चांगली होते. पाउस २ तासांनी थांबला. मी मुलीला डान्स क्लासला जाताना घाई घाईत भिजलेली, रिकामी टोपली घेवून ती आजी भेटली. मला म्हणाली बघ मी बोलले होते ना संपतील तू घेतलीस तर.... माझ्या चेहर्यावर हास्य व समाधान उमटले . 

ताडफळाची झाडे शेतावर असायची त्याची पेंडी उतरवून घरी आणायचे. व ताडफळा(ताडगोळे) खायचो ताडी प्यायचो. कोवळ्या पाती(ताडपाती) खायचो. शेती जावून झाड तोडली तेव्हा खूप पाती खाल्ल्या पण रानचा मेवा परत नाही मिळणार  हे गावीही नव्हते. एकदा मी एकटीच मागल्या दारात ताडफळा  फोडत बसले होते. मला ते धड पकडताही येत नव्हते मी माझ्याच बोटावर कोयता मारून घेतला. हौस पूर्ण झाली. नंतर वडिलांनी ते गर काढून दिले. 

माडावरचे मोठाले नारळ, त्यातील पाणी, केावळ खोंबर,शहाळी उतरायला माणूस बोलवून उतरवली जायची. माडाच्या झाडावर चढायचा प्रयत्न खूपदा केला. सरावही करायचे.अर्ध्यावर चढायची, भावंडात मोठी झाल्याने झाडावर सहज चढायचे. आम्ही झाडाच्या फांदीत (कपारीत) लोखंडी धारदार ब्लेड लपवून ठेवायचो. दुपारी झाडावर उंचावर चढून फांद्यांवर बसायचो. खिशात मीठ मसाले न्षायचो व पक्ष्यांच्या संगतीत  झाडावर बसून कच्च्या कर्या खायचो.

 ऐनाच केावळ फळ व स्टार फळ ह्यात कितीसा फरक असेल. 

शेजारील काकीकडे मोठ अस्वनाच्  झाड होतं काळीभोर छोटी छोटी रवाळ चाॅकलेटी गोड अस्वन ती टिपण्यात खाण्यात किती वेळ जायचा माहीत नाही, पण किती आंनद मिळायचा....... अर्वणनीय. 

काजूच्या झाडावर चढून त्याच्या कोवळ्या बिया कापायच्या व तेलकट गर खायचे.पिकलेले लाल पिवळे तुरट काजू खायचे. झालेल्या बिया सुकवायत्या व सकाळी आंघोळीचे पाणी तापवताना चुलीत भाजून, सोलून घरचे काजूगर खायचे. 

लहानपणी मी सुट्टीत माझ्या मावशीकडे रहायला जायचे. तिच्याकडे डोंगर अडवून तयार केलेल्या मोठ्या मोठ्या आंबे फणस, काजूच्या वाड्या, त्या दगडी लाल मातीत जामची खूप झाडे, रसदार पाणीदार गुलाबी  पिस्ता कलरचे जाम हवे तेवढे हाताने तोडून खायचे त्याची मजा काही वेगळीच, त्यांनतर आमच्याकडेही तसेच झाड लावले.व तसेच हाताने तोडून जाम खाल्ले. 

गावात एकाकडे गावठी बदामाचे झाड होते ते मोठाले बदाम गोळा करून त्याच्यांच विीहीरीवर धुवायचे.हिरवे कच्चे  बदाम फोडून कोवळे गर खायचो. पिकलेला लाल वरचा मासलं भाग खायचो. व दगडाने फोडून आतील बदाम गर खायचो. (त्याला रानटी बदाम म्हणायचे. ) 

आमच्या दारात अंबाड्याचे मोठे झाड. दरवर्षी भरून यायचे त्याची पांढरी आंबट फूले मग छोटी कोवळी फळे खायचो जरा मोठे झाले की मीठ लावून मग खारवून व मोठे पिकलेले अंबाडा खायचो. 

खारवलेले काकडे ही कच्ची खाता येत नाहीत, म्हणून खारवून खायचो, पण तेही एक फळच. 

गावरान, रावळ मोठे तुरट आवळे, खावून त्यावर थंडगार पाणी प्यायचो. तृप्ती काय असते, तेव्हाच कळते. छोटे छोटे रानआवळे तेही खिसा भरून, खारवून खायचे. त्याचे झाड आमच्या समोरील गावातल्या काकी कडे होते. 

शेतावरच्या तुतीची, लाल काळी आंबट गोड फळे.

मामाकडे लालभडक रंगाची साल असलेली व आत ताडफळा सारखा गर असलेली व आत काळी बी असलेली अकोला(फळाचे नाव) फळ झाडावर चढून खायचो. सुकलेल्या पानाच्या मागच्या बाजूला चिकटलेली शेंगदाणा सारखा गर असलेली कंस (फळाचे नाव)खायचो. 

उन्हाळ्यात हमखास कोकम फळ दारावर विकायला यायची, ती पिकली तरी खाता येत नसत मग सरबत बनवण्यासाठी विकत घ्यायची साखर घालून उन्हात ठेवायचो. रस तयार झाला की थंड पाण्यात मिसळून प्यायचो. तेव्हा फ्रिज नव्हते. 

                  ही सर्व फळे आताही आम्ही खातो फरक इतकाच  की  त्यात घरची म्हणून समाधान, प्रेम होत. आता विकतची महागातली, फवारणी ची चारवेळा धुवून चांगली असतील ना? ह्या संशयाने पाहून खातो. आता कशात किती व्हिटॅमिन्स आहेत. किती औषधी गुण आहेत  त्याचा हिशेब करून खातो. तेव्हा निसर्गाची उधळण नी रानचा मेवा म्हणून खात होतो. त्यात तृप्ती होती आता त्यात किती व्हिटॅमिन्स  किती रूपयात विकत घेतली त्याचा व्यवहार आणि हिशोब असतो. 


वर्षा प्रभाकर पाटील.©® 

९८१९४०६८१३

३०/८/२०२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4