फूलं




 माझ्या आठवणीतून:

फूल ही मोहवण्यासाठीच असतात. 

माझ बालपण गावात गेलं, प्रत्येकाच्या दारासभोवताली ४-५एकर जागा, आणि पाना फूलांना, फळांनी डवरलेली गर्द झाडी इतकी की लाल कौलारू घराचे टोक तेवढे उंच डोंगरावरून दूरून दिसे. अशा घनदाट झाडीत सकाळच्या वेळी अंगणात , परसदारी फुलांचे सडे पडलेले असायचे दररोज सकाळी पहाटे आई अंगण झाडी आणि नंतर तिथे प्राजक्ताचा सडा पसरे, तो आम्ही उठल्यावर परडी छोटी टोपली, चाळण किंवा स्कर्ट ह्या मध्ये गोळा करत असू, त्याचे हळदीचे डाग, मंद सुवास आणि दवबिंदू, स्कर्ट वर चिकटुन बसे. मग पांढरी शुभ्र टगर, झाडावर चांदण्या सारखी फुललेली असे. जितका हात उंच पोहचेल तिथपर्यंत सर्व फूले खुडून, जर फूले कमी मिळाली असतील तर स्टूलवर उभ राहून वरची फूल खुडायची. डबल टगरी दिसायला सुदंर, भरलेली ,जास्त कुणाकडे नाही म्हणून आवडीची ,मग मोर्चा जास्वंदी कडे तिचे लालचुटूकू मोठाले फूल हाराच्या मध्ये मध्ये असायलाच हवे, त्याच्या मोठाल्या झाडावर चढून ही फूले काढायची, जर देवाला व्हायची नसतील तर त्यातील पिवळे पराग गट्टम करायचे, त्याचाही हळदी रंग हाताला चिकटायचा,  छोटी छोटी सदाफूलीची रोपे एका लाईन मध्ये अंगणाच्या किनार्यावर लावलेली ती सूंदर पांढरी गुलाबी फूले भाजी साठी खेळण्यात उपयोगी येत असत. आमच्या शेजारी आम्ही त्यांना शेड्यावर म्हणायचो,सुंदर गुलाबी पांढरी जास्वंद असे तीही मागून गोळा करत असू. नवरात्रीत, भेंडीचे फूल माळीत विराजमान होत असे, गौरीचे हे आवडते फूल त्याशिवाय तिची माळ पुर्ण होत नसे. आणि पावसाळ्यात लिलीचे,पावसाळ्यात एक पावसाळी कंद मोठाले फूल घेवून उगवत असे १-२फूट हिरवेगार देट व त्यावर गुलाबी गोलाकार मोठे फूल त्यावर प्रत्येक पाकळी ही सूर्य किरणासारखी लांब  असे. कधी कधी फूल मिळत नसत मग पांढरी पिवळी भगवी बिट्टीची फूले कामी येत असतं आम्ही त्याला करण टेाक म्हणत असू. ह्याचे हार सर्व ओसरीत(हाँलमध्ये) लावलेल्या देवांच्या , आजोबांच्या फोटोला, करत असू. ना कधी आळस ना कधी कंटाळा ,देवाचे काम खूप श्रद्धेने करत असू .आईचे संस्कारही तसे होते. माझ्या आईत मला नेहमी श्यामची(साने गुरुजींची) आईची छबी दिसत असे .वात्सल्य, कारुण्य परोपकार ह्याने भरलेली मंगलमयमूर्ती.

मागच्या दारात अबोली , मोगरा ,डबल(बट)मोगरा भरभरून असायचा त़्याचा गजरा दररोज माझ्या केसात लहानपणापासून एका बो मध्ये खोवलेला असायचा, माझी आत्या माझे केस एक, किंवा दो बो बांधायची त्यावर गजरा माळायची पावडर व काळ गंध लावून आड रस्त्याने  शाळेतील मागच्या बाजूने शेतातून, शाळेत प्रथम आई, आत्या, व नंतर गावातील मुलांच्या घोळक्यात दप्तर लटकावून जायची. माझ दप्तर ही इतर मुलांहून वेगळ असायचं निळ्या धाग्याने विणलेल , आणि त्यावर लाल धाग्याच्या टाक्याने नाचणारा मोर काढलेला, आणि मोठी झोळी सारखी निळी कापडी पट्टी आणि त्याला लाकडी बटने, जिथून शाळेत एन्ट्री घ्यायचो तिथे नविन बांधलेला सातवीचा वर्ग होता. आणि  तिथल्या मुली मी पोचले की लगेच मला उचलून घ्यायच्या एक झाली की दूसरी..... 

  सुईने धाग्यात ओवून मग गुंफून  लहानपणी च गजरा करायला शिकले ते फुलांच्या आवडीतून... 

अनंताची फूले इतकी डवरून यायची की हार करायला बाकी फुलांची गरजच नसायची, पूर्ण परीसरात फुलांच्या वासाचा घमघमाट

 इतकी आवडे फूल मजला.... 

आमच्या गावात सोन(पिवळा )चाफा, कवठी चाफा, हिरवा चाफा हे तिन्ही चाफा वेगवेगळ्या तिन्ही शेजार्याकडे असायची व तिन्ही शेजारी  ती फूले बाजारात नेवून विकायची पण गावात मुलांसोबत खेळताना संध्याकाळी त्याची कळी मला दाखवून उद्या हे फूल तूला करून, सकाळी शाळेत जायच्या अगोदर घरी घेवून यायचे उशीर झालाच तर जाताना रस्तात उभ राहून वेणीत  पीन आडकवून घालायचे(फुकट द्यायचे).


ती येते आणि फूल घेवून जाते..... 

 आमच्या गावात जरा दूरवर एक मठ आहे.(प्राथमिक) शाळेतून मधली सुट्टी झाली की . (शाळेपासून दूर) आम्ही मैत्रिणी धावत सूटायचो , बकूळीची मंद मंद सुवासाची फूल वेचायला दुसर्या दिवशी जिचा गजरा लांब तिने जास्त फूले टिपली तो बनवायचो ही झाडाच्या तान्यात, तेव्हा कसलेच भय वाटत नसे  वाटे ते वेड धुंद वासाचे! .. . . 

शेजारच्या काकीकडे जावून पुस्तक वाचायचे मला भारी वेड सुट्टीत संध्याकाळ, रात्र झाली तरी पुस्तक संपल्या शिवाय उठत नसे, तेव्हा त्यांच्या दारातील रातराणी तिच्या मंद वासाने वेड लावत असे. तो दरवळ नाकातून सरळ डोक्यात भिंनत असे.

            गावात ज्या मुलीकडून हिरवा चाफा मिळायचा तिची आतेबहीण जवळच्याच गावात रहायची तिच्या दारात भले मोठे सुरंगीचे झाड होते ती हंगामात आठवड्यातून खूप सारे गजरे घेवून यायची आमच्या गावात सगळे विकत घ्यायचे त्यात ती एक राहीला तरी घरी घेवून यायची,फुकट देवून जायची जास्तीचे  असले तर आई काकी विकत घेत असे. त्या फुलांचा घमघमाट (वास) खूपच छान हवाहवासा वाटत असे. ती फूले खूपच नाजूक असतं त्याचा पिवळा धम्मक रंगही मनाला भुरळ पाडत असे. 

          शाळेत मैत्रीणी कडे कुंडीतील गुलाबाचे झाड होते. मधल्या सुट्टीत वही विसरल्या वर घरी बरोबर जायला सोबत म्हणून मला घेवून गेली. गुलाबाचे एक फूल सोबत गेले म्हणून भेट दिले. नंतर खूपदा घरी खेळायला गेले, आवडत म्हणून गुलाबाचे फूलं मिळत गेली मैत्रिणी कडून.... 

माझ्या दोन्ही काक्या गावातल्याच एकीच्या दारात डांळीबाचे झाड व गुलाबाचे त्या डांळीबाचे फूल ही मला शाळेतून घरी येताना मिळत असे, दुसर्या दिवशी ़शाळेत जाताना आर्वजून ते माझ्या केसात माळलेले असे.आईबरोबर त्यांच्या घरी गेले की काकीची बहीण खूप सारी गावठी गुलाबाच्या फुलांची जूडी करून हातात द्यायची, त्याचा फिक्कट गुलाबी पांढरा रंग, आणि मंद मोहक वास मन प्रसन्न करून टाकायचा. 

दुसर्या काकीकडे प्रचंड मोठे झाड ,नरसाळ्या सारखे लांब देट व फिकट गुलाबी पाकळ्या खूप फुलांचा सडा पडलेला असे, ती फुलं टिपण्यासाठी मुद्दाम शाळेतून घरी येताना लांबचा रस्ता पकडी.आणि त्यांच्या दारातील फूले टिपून घरी घेवून येत असे. तसेच बाजारात, दुकानात,गिरीणीत जाताना ते घर रस्यात लागत असे,, रस्त्यातूनजाता येता फूले  गोळा करून फूल एकात एक लांबलचक देठ  गुंफून वेणी करायचो त्याला पिन किंवा धाग्याची ही गरज नसायची. ..... 

भांवडाबरोबर मळ्यात भाजी आणायला जायचे तेव्हा गाजराची, आस्टर, ,रजनी गंगा, शेवंती, झेंडूची चमेलीची फुलांची लांबच लांब रांगा पाहून नकळत फूल तोडायचा मोह व्हायचा, आणि हातात फूल पाहीले की मळ्यात काम करणारी माळीण प्रत्येक प्रकारचे, प्रत्येक रंगाचे फूल घेवून मोठा गुच्छ हातात द्यायची. ती फूल हातात मावायची देखिल नाहीत. आणि हातात पकडताना कसरत व्हायची ,आनंद तर गगनात मावत नसे. शाळेला सुट्टी पडली की मोगर्याच्या वाडीत मुलं फूल खूडायला जायची, आम्ही त्या वाडीत एकत्र गावातील मुली कळ्या विकत आणायला जायचो. (१₹१००कळ्या)घरी आणून गजरे विणायचो ,गणपती गौरीला केवडा हा पूजेला लागतोच, माझ्या मामा कडून पहिल्या मचव्याला केवड्याचे अख्ख भल मोठ फूल  मामा पाठवायचे, मग त्याची एक एक पाती गावात प्रत्येक घरी पाठवली जायची पाती दुमडून पिनाने केसात माळायचो ,उरलेल्या ओल्या कपड्यात गुंडाळून गौरी साठी ठेवायच्या, त्यातील मधल्या मगजामध्ये असलेली सुवासाची पावडर हातांना चोळायची,सर्वांग केवड्याच्या वासाने  माखलेल असायचं, ती पावडर कॅरम खेळताना कॅरम बोर्ड वर टाकायला उपयोगी यायची.सुट्टीत मामाकडे जायचो तेव्हा पानगळ झालेले पण फांदी फांदी डवरलेले बटन चाफ्याचा झाड,होते. त्या झाडावर चढून त्याची फूल तोडून मस्त पाकळ्यांना होल पाडून पाकळ्या देठात अडकवून बटनं बनवायचो ती शर्टाच्या बटनावर अडकवून त्याच नाव बटन चाफा सार्थ करायचो,, दुपारी मामाच्या छोट्याश्या बागेतील वेलीवर ची जाई जूई खूडायचो व नंतर त्याचे गजरे करून मा़ळायचो, मरगंडी, पाढंर्या , रंगाची कागदी फूले मला खूप आवडायची हलकी वार्यासंगे दूरवर पडायची पाकळ्या फाटायची भीती नाही लगेच कोमजायची ही नाहीत. डोंगरावर भटकायला जाताना अग्नी शाखेची लालबुंद फूल टिपायचो जणू विस्तव हातात पकडली आहे.आजीने मला खूपच लहान असताना वेणी विणायला शिकवले. व येता जाता सर्वाना एवढीशी पोरगी वेणी वािणते. म्हणून कौतुक करायची. मग माझ्या  अंगावर मुठभर मास चढायचे. मामाच्या घरापासून पाण्याच्या विहीरी दूर होत्या. पाणी वाली बरोबर, घरातले आंघोळीला कपडे धुवायला विहिरीवर जात,. कळशी/ हंडा घेवून पाणी आणायला आम्ही ही जात असू.आजी खूष होत असे. तेव्हा तिथे पाणी टंचाई व आम्ही भरपूर पाणी उपसत असू. मग शिक्षा म्हणून आम्हाला विहिरीवर पाणी आणायला पाठवत असतं. विहीरी शेजारी लागूनच तळे होते. तळ्यात गुलाबी, पांढरी, निळी कमळे असत. पूर्ण तळे फुलांनी भरलेलं. व तिथेच छोटे शिवमंदिर होते. तळ्यातले पाणी पिण्यासाठी गुर येत. व त्याच्या बरोबर गावातील मुल ती आम्हाला तळ्यातील कमळे काढून देत. काही देवळात वाहून बाकी घरी आणत असू देट मोडून हार करत असू देवाला. आजोबांच्या फोटोला. आजी खूष होत असे. आजीला खूष करण्याची कला तेव्हा मला अवगत होती. छोट्या छोट्या कामाने ती खूष होई. 

      अकरावीत असताना काॅलेज सुटल्यावर रस्त्यावर, आम्ही मैत्रिणी बसची वाट पहात थांबायचो. रस्त्याच्या कडेला मोठ्या पाण्याच्या पाईपलाईन गेल्या होत्या. त्याचे पाणि सांडून दलदल तयार झालेली व त्यात खूप सुंदर कमळे उगवलेली. वर्गातील मित्र ती कमळे काढून देत. ते कठीण व जोखमीचे असूनही ते खाली उतरत  व फूल काढून देत. तेव्हा खूप आनंद होत असे.  बारावीच्या क्लासला जात असताना आत्याच्या गँलरीतील गुलाबाचे फूल दररोज माझ्या केसात माळलेले असायचे वर्गात प्रवेश करताच,  नाव माहीत नसलेली मुले गुलाबाचे झाड आले, फ्लावर पाँट आला म्हणून चिडवायचे. पण मी फूल घालणे सोडले नाही. मी लहानपणी आई बरोबर शेतात जायचे तिथे घाणेरीची झाडे खूप ,पण ती जंगली छोटी छोटी फूल ही मला मोहवायची मी ती तोडून आईच्या व माझ्या केसात माळायचे, आईही वनईची छोटी निळी फूले तोडून केसात(अंबाड्यात) खेोवायची, व सवाष्णीने हीला माळल्याशिवाय ओलांडून पुढे जावू नये, तीही सवाष्णच आहे, म्हणायची. मला काही तिचे बोलण समजायचे नाही .पण मीही तोडून हातात घ्यायची. 

         काॅलेज मध्ये जाताना रस्त्याच्या बाजूला मजूर वर्गाच्या घरातील(झोपडीतील) मुली माझ्या सायकल मागे धावून सुमन सुमन हाका मारायच्या आणि फुलांचे गजरे द्यायच्या. मी ते आनंदाने घेवून केसात माळायची . 

नवरात्रीत माळा करण्यासाठी  फूले कमी पडली की झेंडूची फूले  कामी येत.. ती विकत आणावी लागत असतं दसऱ्याच्या दिवशी तोरण बनवण्यासाठी खास त्या फुलांचा वापर करतात. डेकोरेशन करण्यासाठीही कामी येतात. 

         काही कारणास्तव आम्ही घर बदलले, आणि टाउनशिप मध्ये रहायला गेलो. गावातून घरी जाताना company च्या बस मध्ये एक मुकी मुलगी माझ्या ओळखीची झाली ती त्याच आमच्या गावातील वाडीत कळ्या खूडायला जायची. घरी येताना कळ्या घेवून यायची बसमध्ये अर्ध्या कळ्या मला देवून जायची ती जेव्हा जेव्हा बसमध्ये भेटायची तेव्हा मला कमी असल्या तर सर्वच कळ्या देवून  मध्ये उतरून जायची. 

       ब्रम्हकमळ किंवा कृष्ण कमळ हे बहुधा रात्री उगवत, ते उतरल्यावर त्याची छान पूजा करतात. मी कित्येक रात्री वेगवेगळ्या लोकांकडे ते फूल पाहण्यासाठी,पूजा करण्यासाठी गेलेली आहे माझ्या आत्याच्या बिल्डिंग मध्ये आम्हाला पहायला बोलवलं होत. तिथे मी पहिल्यांदा ते फूल जवळून पाहिलं.आम्ही बालाजी नगर मध्ये रहात होतो तिथे दोन्ही शेजारी कडे ते फूल झाड होतं व दरवर्षी आवर्जून ते आम्हाला पहायला बोलवत ते शुभ मानून त्याची पूजा करण्यापूर्वी बोलवल. आम्ही ही आर्वजून जात असू.

            आता दारात केव्हातरी गावठी गुलाबाची फूले, मोगरा, जाईचा गजरा विकायला येतात. म्हणजे ते काका मुद्दाम घेवून येतात .मी घेते सण असो नसो. कुठे जायचे असो नसो , एखाद्या दिवस माळायचे ही  विसरते .पण फ्रिजमध्ये मस्त दरवळ पसरलेला असतो. ........


 Varsha patil.©

uran(navi mumbai) 

9819406813

8/4/20

5:30pm

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4