नूर भाग : १
नूर भरभर चढ चढत शेवटची कितारारू(बास्केट) आधीच्या राशीत पालथे घातले, ठेकेदारा कडून दिवसाची मजूरी घेतली व चढण चढता चढता पान खूडत बास्केट मध्ये टाकत मेन रस्त्याला लागली. झरझर रस्ता कापत घराकडे वळली. दारातच बास्केट उतरून बांधलेल्या बकर्यांना पाला टाकून घरात शिरली. चुलीवर पाणी चढवून आतल्या खोलीत डोकावली, बाप पानाची वळी ओढत पाळणा हलवत होता.नहाणं आटपून चुलीवर पाणी चढवून पान धुवून त्यात टाकली. उकळून काढा तयार केला. थाळीत ओतून बापाला दिला. पोरगं मांडीवर घेवून त्याला घोट घोट पाजला! कडवट चव असून पोरगा आईला ओळखून खुदकन हसला. परत तिने त्याला पाळण्यात टाकून स्वताला काढा घेतला. गरम गरम काढा पोटात गेल्यावर खूप उत्साह वाटला दिवसभराचा क्षीण कुठल्या कुठे निघून गेला. बाप परत पानाच्या वळकटीत तंबाखू भरून ओढू लागला. तिने मघाची मजूरी हातात घेतली. थोडीशी चिल्लर डब्यातून काढून घेतली, व बाहेरची कडी लावून परत झरझर पावले टाकत दुकानात शिरली २किलो तांदूळ १/२किलो डाळ ,साखर नी बिस्कीट पुडा घेवून परत चालू लागली. बाहेर गार वारा जाणवत होता, आजूबाजूला अंधार दाटून रस्त्यावरचे दिवे मिणमिणत होते. घरी आल्यावर बकरीर्चे दुध काढू लागली, हे सर्व करताना ना तिला भूतकाळ आठवत होता, ना भविष्याची चिंता होती, विचार होता तो फक्त काम संपवण्याचा,....
बाळाला दूध बिस्कीट भरवून बापाला चहा दिला, ताज्या पानांचा कडवट काढा नी त्याच काढ्यात दूध नी साखर टाकून केलेला चहा पृथ्वी वरील अमृत. आणि त्याच पानाचे तटवे त्यांच्या जीवनाची शिदोरी स्वताची टेकडीची जागा बाप ती शिकत असतानाच विकून मोकळा झाला होता. मिळालेला पैसा लग्नात संपला होता. नी आपल्याच टेकड्यांवर मजूरी करण्याची वेळ नूर वर आली होती. पण तिला त्याची खंत नव्हती तिला चिंता होती ती लहान पोरगं बाप सांभाळेल की नाही. नी काही कारणाने काम सुटल तर रोजंदारीवर पेटणारी चूल विझू नये, एवढीच तिची इच्छा होती.
तिने हातात झाडू घेतला सार घर झाडून घेतलं. बाहेरच्पा पडवीत बकर्यांंच्या पानांची दिवसभराची घाण तिला आताच साफ करावी लागणार होती, सकाळी सारे आटपताना तिला हे जमणार नव्हतं, टेकडीवरच घर एवढच बापाची जायदाद राहीली होती, हे घरचं फक्त आता मुलीच होतं.
चुलीवर तिने तांदूळ डाळ चढवली, रटरटीत डाळ भात बापाला वाढून स्वताला थाळीत काढून घेतलं, बाळाला माडींवर घेवून दोन घास भरवले, काम आटपून रजई अंथरली मुलाला उशाशी घेवून अंग टेकले. दिवसभराच्या कामाने क्षणात झोपेच्या आधीन गेली..........
क्रमश:.....
भाग १
वर्षा प्र पाटील. ©®
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा