तांबडी माती भाग: ३
भाग २ वरून पूढे चालू
गड्यान हातात बुतारा(माडाच्या जावळीच्या काड्यांचा झाडू) , टोपली, फावड रग्याच्या हातात दिला, ती गोठा दाखवला, मोट, मळा, बैल जोडीची माहीती दिली. सगळी काम समजावून सांगितली.
आठ दिवसापासून आधीचा नोकर सोडून गेला होता, तेव्हा गोठा अस्तवस्त होता. इतर नोकरांनी वर वरून साफसफाई केली होती. लग्नानंतर हातात झाडू घेतला व कामाला लागला , गोठा झाडून लख्ख साफ केला गवताचे भारे नीट लावले, गवताच्या गंजी सोडून प्रत्येक गाई बैलांना चारा दिला, कालच्या वेळूच्या अंगावरून हात फिरवला, खोडानी ओळखी खातर पाय पूढे मागे केले. टाकीतून पाण्याच्या बादल्या गायी बैलांच्या पुढ्यात मांडल् गुरं मनसोक्त पाणी प्याली.सारी जनावरे काथ्याने घासून धुवून काढली. मग गोठा चकाचक धुवून काढला. मोटीवर जावून बैल जुंपले, सारा मळा शिंपला, मग पाण्यानं हौद भरलं, गड्याला सांगितल, सारी काम पार पाडली. विहिरीवर हात पाय धुतल ,घटाघट पाणी प्याला.शरीरावर एका थंड स्पर्शाची लहर उमटली. गड्याला आवाज दिला, सारं चकाचक झालेल पाहून तेही इतक्या कमी वेळात! कामाचा आवाका पाहून गडी मालकाच्या कानावर घालायला धावला.पाटलांन सर्व साफसूफ पाहून आपला निर्णय चुकला नाही गडी कामाचा निघाला. असं मनाशीच म्हणाला, गड्याबरोबर कपड्याचा जोड नी साबण पाठवून दिला. त्याला म्हणाला दररोज काम आटोपला की विहिरीवर अंघोळ कर.नी परसदारी त्याला जेवायला वाढ. आजचा दिस दुपारच्याला घरला जा. सांच्याला परत गायी पाजवायला ये, रग्या मनोसक्त पाण्यात न्याहाला, जेवला, नी सांच्याला येतो सांगून पारावर पळाला. पोर वाट बघत व्हतीच. रग्याने सर्व तपशीलवार रंगवून सांगीतलं, आता दररोज आपल्यात रग्या असणार नाही, बोलल्यावर मुलं हिरमुसली. पण पहिल्या पगाराला पार्टी सांगितल्यावर खुष झाली. त्यांच्या सोबत थोडा वेळ घालवून रग्या परत आला. गड्यांनी वटीवर चहा आणून दिला. दूधाच्या किटल्या नी वेगळ्या ठेवलेल्या बादल्या दिल्या, रग्या चहा पिवून गोठ्यात गेला, आता हेच त्याचे सवंगडी होते परत त्याने कडबा, चारा घातला . हौदातून पाणी काढून बैलांना पाजल.रिकामा हौद भरण्यासाठी कावड घेतली. नी रहाटावर पाणी शिंदून हौद भरला, चराचर दूध काढून एकामागून एक किटल्या भरत गेला. पुढच्या वटीवर मांडल्या मालकांन छकडी झुपांयची आज्ञा दिली. पाटलांन सांगितलं आज हा गडी बरोबर घेवून जा, तो तूझी नी डेरी वाल्याची ओळख घालून देईल. उद्यापासून एकटाच जा, येताना घरला जा नी छकडी गड्याबरोबर पाठवून दे. उद्या उजडायच्या आत ये सकाळच्या ४ वाजता गायी पाजवून परत बाजारला जायच हाय, इथ पर्यतं अंधारून आल होतं, गड्याला, "रग्याला " त्याच सांजेच जेवण घालायला सांगितलं, पाटलाची सगळी काम चोख . नी गडी माणसं ती एका आज्ञेत पार पाडणारी.
हळूहळू रग्याला दिवसभराची सगळी काम क्रमवार पाठ झाली. आपली काम आपणच पार पाडायची व त्यात कोणतीही चूक करायची नाही, की पाटील खूष एवढचं रग्या एका दिवसात शिकला. सकाळ च्या दुभत्या गायी वेगळ्या नी संध्याकाळच्या वेगळ्या. बाजाराला दूधाच्या दररोज २ फेर्या, मालव्याच्या भाजीच्या आठवड्याच्या २ फेर्या वेगळ्या.
जेवण उरकून छकड्याला बैल जोडून रग्या नी गडी बाजाराला निघाले, बैलांच्या गळ्यातील घुंगरू बैलांच्या पायाच्या लयीत छान ताल धरत होते. गडी रग्या ला पाटलाच्या वाड्यावरच्या गोष्टी रंगवून सांगत होता. संध्याकाळचं गार वारा अंगाला झोबत होता.
रातच्याला गड्यांच्या हवाली छकडं देवून, रग्या नं झोपडी बाहेरून म्हातारीला आवाज दिला, म्हातारीन दार उघडलं रग्या हात पाय धुवून येईस्तोपर भाकरी नी पिठलं वाढलं, नी रग्या काय बोलतो ते पाहू लागली, काय बोलला मगं पाटील ? गावली का नोकरी? म्हातारीनं आधीरतेनं विचारल, रग्याला म्हातारीच्या बोलण्यातील चिंता कळली, त्यांना सकाळ पास्न, सांज पातूरची गोष्ट सांगितली. उद्या सकाळी कोंबड आरवायच्या आत जायचं आहे. तिला लवकर उठीव सांगून जमिनीवर घोगंड टाकून आडवा झाला, दिवसभराच्या शिणानं लगेच झोपून गेला. म्हातारीच्या मनात काही बाही विचार चालू होते. वर्षभर असाच पाटलांकडं टिकला, तर त्याच्या जिवाचे सोन होईल, पोर मार्गी लागलं नी मी त्याच्या मायला दिलेल्या शब्दातून मोकळी होईन, उद्या उशीर होवू नये म्हणून म्हातारी टक्क डोळे उघडे ठेवून जागी राहीली......
क्रमश:
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा