कात भाग (१)13/1/2022
ती काम आटपून परसात झाडाखाली चौपाई वर बसली होती. अचानक तिचे लक्ष झाडाच्या बुंद्याजवळ गेले. पांढरीशुभ्र जवळ जवळ सहा फूट लांब कात पडली होती. जनावर कात टाकून चकाकतं अंग घेवून त्यातून बाहेर पडल होतं, ती विचार करत बाजूवर पहुडली काय? चुकलं होतं तिचं ! ती अशिक्षित असली तरी तिलाही मन होतं, आपला जीव प्यारा होता.
घरात नवरा दोन नणंदा, दिर, सासु सासरा, नवरा मंद कुणीही काहीही सांगितले तर नंदी बैलासारखी मान डूलवायचा, आणी डोक्यात राख घालून घरी येवून वायकोला मारायचा सासू सर्वाशी गोड गोड बोलायची पण घरात फटाकडी कधी चुलीवर पडेल नी वाजेल नेम नाय, सासरा बेरकी, बाता करण्यात पटाईत ,इथे चौर्या कर मार्या कर. लबाड्या कर.नणंदा छचोर, कामचोर, लाडीक नटण्याथटण्यात पटाईट! दिर रागीट जणू डोळ्यातच विष ओढलेल्या नजरेचा ,त्यात पाण्याची पंचाईत उन्हात, तासनतास चालत जावून सात सात भांडी डोक्यावर घेवून यायचं, इतक्या माणसाचं कपडे रोज एकटीन धुवायचं, जेवणं करायची! भांडी घासायची नी डोंगर धुडाळाला जायचं, नकळत तिच्या डोळयात पाणी चमकलं,आकाशत नजर लावत तिने आठवलं आपण कामाला वाघ, पण.. .छळच संपत नाही, मग काय करणार! इथ राहणं काय आणि तिथं राहणं काय? पण तिथे राहीली असती तर सासरी नांदते म्हणून नाव झालं असतं, इथ बी भावसाच्या बायकोचा त्रास! लाकडं आणा, गौर्या धापा दुध काढून गावात विकायचं शेणगोठा करायचा, म्हशीला गायींना डोंगरात चरायला न्यायचं, त्यांच्यासाठी चार कापून गवताच भारा आणायचा सरपण गोळा करायचं, कुणी बोलायला नाय, पण रानातील वारा कानात भरला की वेड लागायचं, पावसाचं पाणी अंगावर पडलं की शरीर मोहरायचं, रानात कोकीळीचा आवाज ऐकला की उगाचच गाण गावं वाटयचं ! दोन वेळच्या भाकरीच्या तुकड्यासाठी राब राब राबायचं, भावाला पोरबाळ नायं बाप नी आईस मरून चार वर्ष सरली दोघं एकाच वर्षात गेले, खोपटात तिघचं , आयशीनी तिचा एक मणी, गवत विकून आणलेला पैका, घेवून शेजारच्या गावचा गडी हेरला नी, १०-१२खोपट्यांना मटण नी दारू घालून लगीन लावून दिला, आज लग्नाला आठ वर्ष झाली नी घरला परत आल्याला पाच वर्ष सरली, ती साडी ना तो सोन्याचा मणी तसाच मंजी कडं होता.! पण...
उंचावरुन घारीची सावली अंगावरून गेली, नी तिची तंद्री भंग पावली. ती उठली तोंड धुतले वेणी फणी केली. टोपली खाली करून ठेवलेले वेगवेगळ्या फुलांचे गजरे केळीच्या पानात गुंडाळले. व टोपली घेवून गावात गेली. सांजच्याला परत आली किती गजरे विकायला गेलीस? पंद्रा ! किती रूपये आणलंस तीस रुपये, दे मला. दारात भावाच्या बायकोने सगळे पैसे घेतले.मंजीने पीठ भिजवून दा(१०) भाकऱ्या भाजल्या ,परत कांदा मसाला आणायला गावात गेली, भावांनी हालाल करून मारलेला कोंबड्यांचा रस्सा केला. भावांनी तीन पेल्यात दारू ओतली नी ताटात तीन तीन भाकऱ्या घेवून सगळे जेवायला बसले. ताटाचा धक्का लागून भावाचा ग्लास सांडला ना त्याने बायकोच्या थोबाडीत दिली. मंजीनी स्वताचा पेला त्याला दिला ना रंगाचा बेरंग झाला, अर्धा रस्सा तसाच राहीला, सगळे जेवणावरून उठले. जेवण झाकून भांडी घासली, ती ती घोंगडी टाकून झोपायला गेली दिवसभर काम करून थकल्यावर अंग टेकताच ती झोपी गेली.
सकाळी लवकर उठून भाकर्या भाजत असताना भावजयने चुलीत पाणी ओतले, नी आम्ही आज पासून तुझ्या हातचा खाणार नाय सांगितल तिच्यापूरत्या दोन भाकऱ्या ना कालची शिळी भाकरी फडक्यात बांधून , कालचा मटणाचा रस्सा डब्यात भरून ती गुरं घेवून डोंगर कड्यावर निघाली. नेहमी ती डोंगरात माळ्यावर कुराणात गुरं घेवून जात असे, तेवढ्या वेळात सुका लाकुड फाटा गोळा करत असे, ते करताना वेलीवरची फूल खुडत असे, मोठ्या झाडाच्या सावलीत बसून गजरे बनवत असे, डबा खात असे. संध्याकाळ झाली की आपोआपच गुरं घराकडे वळत नी एका पाठोपाठ घरी येत. त्यांना घरचा रस्ता पाठ होता. घरी आली की ती पोट भरलेल्या गायींचे दुध काढत असे आणि दुध नी गजरे गावात जावून विकत असे.
भावजय हतातून पैसे खेचून घेते, म्हणून ती आधीच गजरे वेगळे लपवून त्याचे पैसे जमवत असे ,पण कपड्यांचे पेटारेही ती उघडून पैसे घेत असे , तेव्हा ती जंगलात जेवणाचा डबा झाडाखाली पुरून त्यात पैसे जमवत असे, आणि भावजयला त्याचा पत्ताही नव्हता.
आज मात्र ती गुर हाकत पूर्ण जंगलात आत पोहचली, घनदाट जंगलात बरच वाढलेलं कुरण होतं आणखी पुढे जावून पहावं का हा विचार तिच्या मनात डोकावला, पण संध्याकाळी परतताना उशीर झाला तर ..नाहीतरी आज तिला घरी जायची इच्छा नव्हती. दवांनी ओल झालेलं गवत पाहून गाई गुरं तिकडे च रेंगाळली. ती मात्र तसाच रस्ता चालू लागली आता मात्र जंगल संपून डोंगर माथा लागला छान सपाट जागा नी दोन्ही बाजूला कडेकपार पण आता तिला तहान लागली आजूबाजूला झरे नव्हते, गार वारा मात्र अंगाला उन्हाची झळाळी जाणवू देत नव्हता, तीला थोडी दूर झोपडी दिसली पाणी पिवून आणलेला डबाही खाता येणार होता. ..
झोपडी जवळ जाताच तिथे बाहेर दोन 5 आणि 3 वर्षाची मुलं चुलीत फुंकर मारत बसलेली पाहीली . तिने मोठ्या मुलाला आईजवळून पाणी घेवून ये सांगितले, तो मुलगा नुसताच तिच्या कडे पहात राहीला.त्याच्या बाजूच्या भांड्यात पाणी होत, परातीत पातळ भिजवलेल पीठ होत, अशा रानात कुणाची मुलं असतील असा विचार करून तिने मडक्यातलं पाणी घेवून घटा घट प्याली. मग तिने झोपडीत डोकावलं झोपडीत कुणीही, नव्हतं, पोरांना काही सांगता येत नव्हतं. तीला भूक लागली होती. तिने मुलांना भूक लागली का विचारलं त्यांनी मानेनेच होकार दिला, तिने पटकन शिदोरी सोडली, दोन्ही मुलांना भाकरीचा एक एक घास भरवला, आणि मुलं खुश झाली. मटणाच्या रस्सा बरोबर तिनही भाकऱ्या तिघांनी फस्त केँल्या आता मुलं थोडी सैलावली. तिने आशाच भाकर्या करायच्या आहेत का विचारलं त्या मुलाने हो म्हणताच तिने परातीतील पातळ भिजवलेलं पीठ घेवून अजून पीठाच्या पिशवीतून पीठ घेतलं आणि पटापटा चुलीत ज्वाळ तयार केला आणि 10-12भाकर्या भाजल्या ,तिथ पर्यत त्या पोरांचा बाप चुलीत भाजायला कोंबडी घेवून आला. तिने तो कोंबडी साफ करेपर्यंत मसाला तयार केला ,अर्धी कोंबडी भाजून आर्धीचा रातच्याला रस्सा तयार केला. ही कोण बाई आपल्याला मदत करते ते त्याला कळेना ,जेवता जेवता त्याने आपली बायको मरून दोन महीने झाल्याचे सांगितले. दोघांनी बर्याच गप्पा मारल्या .आणि मग ती घराकडे वळली.... ..रानात बराच वेळ चरलेली गुरं घेवून ती घराकडे निघाली ती आज वेगळ्याच जगात वावरली होती तीला बोलायला आज एक माणुस मिळाला होता, गोड शब्द बोलायला दोन लहान पोरं मिळाली होती. .....
क्रमश भाग 1
वर्षा पाटील ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा