कुंतल
आखणी एक आजीच्या नावाने हाका मारत येई ती बेहरीण ती दुपारी डोक्यावर भली मोठी भांडी भरुन टोपली घेवून येई ती आपल्या डोक्यावर एवढा मोठा भारा कसा घेवून येत असे ते एक कोडेच असे, ते गरीब वाटत असले तरी गरीब नसत कारण त्यांच्या हातात, पायात मोठमोठी चांदीची कडी असतं, तेही आजी जवळ पाणी प्यायला मागत आजी त्यांना खुप सारे कपडे देई, आणि भांडी घेई बर्याचदा डबा मागे, आईही त्या बोहरणीकडे कपडे देई जास्त करून साड्या आमचे छोटे कपडे, आई साड्या द्यायला जास्त तयार नसे , एवढ्या सार्या कपड्याच्या बदल्यात ती छोटसं टोप देई, मला ते पाहुन फार जीवावर येई मी मला स्कर्ट, हा फ्राँकवर अजून घालायचा आहे करुन एक एक कपडा त्यातून काढीत असे. मग ती कपडे परत ठेवायला लावून भांड जरा मोठ बदलून देई.आई साड्यांची गोधडी शिवत असे, पण मनात मात्र तिला आजीला दिलेला डबा आवडलेला असे. आजीला तिच्या नऊवारी साडीवर एक जास्त दिलेल्या पँन्टवर, तिला डबा मिळाला मी नऊवारी साडी कुठून आणणार करून उसासा सोडे ,
त्यानंतर एक मुस्लिम बाई अंडी न्यायला दर्गयातून येत असे. तीचे केस पूर्ण लाल रंगाचे आणि दातही मशेरी लावल्याने लाल रंगाचे असत, अॅल्युमिनियम च्या डब्यात ती कणी ठेवत असे आणी पाळीव कोंबड्यांची गावठी अंड्डी ती आजीकडून घेवून त्या डब्यात ठेवी व नेवून बाजारात विकत असे, ती बाई मात्र मला आवडत नसे, कारण ती आमची खायची अंडी विकून आजीला पैसे आणून देत असे, ती पिशवीभर कणीही नेत असे. आजीने एका अंड्याचा भाव पंच्चाहातर पैसे केला की ती पन्नास नाहीतर साठ पैसे करी, बाजारातील अंड त्याहून डबल मोठे असले तरी ते 40 ते 50 पैशाला मिळत असे. पण आजी मात्र तिच्यावर खुश असे. आजी मला खूपदा दर्गयात घेवून जाई . ती ऊरुसालाही घेवुन जात असे. वडिलही आम्हा भावंडाना उरूसाल नेत.
मग कापूस पिंजून देणारा पिंजार्या हातात मोठा यंत्र घेवुन येई आजी माळ्यावर ठेवलेला बिछाना काढी त्यातील कापूस पिंजून घेवून उषा शिवी. त्यांच्याशी कपडा निवडताना किंमत ठरवताना बराच वेळ खर्च करीत असे.
गारुडी एका टोपलीत साप घेवून येई, कधी दोन साप आणत असे. मग पुंगी वाजवत त्याला डोलवून दाखवत असे, त्याचे दात काढलेले आहेत. कुणाला हातात लावायचा आहे का विचारी. स्वता हातात घेवून दाखवी.पण त्याला हात लावायला आम्ही घाबरत आसू, आम्ही पाया पडून 5पैसे 10 पैसे त्याच्या टोपलीत टाकत . आजी त्याला वाटीभर तेल, लोटीभऱ घरचं दूध ,एक अंड आणि ताटभर कणी/तांदूळ देई. तो ते हक्काने मागे आणि आजी ते नियमाने न आढेवेढे घेता देई. आम्हाला पुंगीचा आवाज फार आवडे.
केव्हा केव्हा सटाके वाला येई, तो स्वताला इतका मार कसा देतो? आणि त्याला ते लागत कसे नाही हे एक कोडेच असे. त्याच्या बरोबर बायको, मूले त्याचे कुटुंब असे, त्याला पैसे द्यायला पूढे जायलाही भिती वाटत असे. त्याचा मुलगाही कधी कधी सटाकेवाला मारून दाखवत असे. आणि बायको गळ्यात एक मुल व एक ढोलक ते बडवत असे.
नंतर नंदी बैलवाला येई, तो पांढराशुभ्र बैल घेवून येई आमच्या गोठयातील गुरांना आम्ही हात लावत असू. पण हा बैल नटवलेला ,शिंग रंगवलेला,अंगावर झालर घातलेला उंच मोठा असा. हात लावायला भिती वाटे पण तो बैल फार आवडे मग भित भित त्याला हात लावला की तो त्याचे अंग शहारून दाखवी मग पून्हा पून्हा त्याला हात लावून पहात असू. त्याच्या ही झोळीत तांदूळ आणि पैसे देत असतं, केव्हा केव्हा तो भविष्य सांगत असे.
त्यानंतर सकाळच्या पारी वासुदेव येई त्याचं गाण खूप छान असे, त्याची डोकयवरील मोरपिसांची टोपीही खुप छान दिसे, तोही भविष्य सांगे. त्याची गाणी ही अर्थबद्ध असतं, त्याच्याही झोळीत तांदुळ आणि पैसे देत असत.
त्यानंतर हातात धूप व कटोरा घेवून एक फकीर येई, तो फकीर उंचापुरा शरीरयष्टीचा होता. , तो आवाज देताना ये माई हाक मारत असे, 'ये अल्ला तुम्हारे दुवा है रोगी रोगी बाल असे म्हणत आठवड्यातून फक्त गुरुवारीच येत असे. त्याच्या हातात एक काठी असे, व त्याला काही दिले की तो आपला हात वर करून आशिर्वाद देत असे. आईची व माझीही त्या फकिरावर खुप श्रद्धा होती. आई त्याला नेहमी न चुकता एक चपाती, तांदूळ व पैसे देत असे.
आमच्या गावात आठवड्यातून दोनदा मुसलमान बिस्कटवाले येत , तो रव्याची रंगीत बिस्किटे, खारी बिस्किटे ,टोस,बटर,खारे छोटे बटर आणि साखर लावलेली समोसा घेवून येत असत. माझी आई प्रत्येकाच्या आवडीचे प्रत्येक पदार्थ घेत असे.
शेतीची कामे सुरु झाली की दूरच्या शेतावर आमच्या पैकी(मी बरोबर)कोणतरी चहा घेवून जात असतं किंवा कुणीतरी न्यायला शेतावरून येत असे, जवळच्या शेतातील माणसे घरी चहा पिण्यास येत, ती 15 -20माणसे ओटीवर, पडवीत आणि ओसरीत बसत, त्यांना पेल्यात गुळाचा चहा आणि टोस्ट/बिस्कीट मिळे.
झोडणी, बांधणी, बरखांदे काढायला वडिलांबरोबर गावातील मजूर नाहीतर आदिवासी पाडयातील माणसं येतं. त्या खळ्यात खेळायला मला फार आवडे, माझी आई तिथे भात फुटत बसे व मी अभ्यास करत किंवा कविता पाठ करत बसे मला आठवत मी तिथे घाल घाल पिंगा वाट्या ही कविता पाठ केली होती.
आमच्या घरी महीनाभराचं गोणभर सामान व 25 किलो गुळाची ढेप डोक्यावर घेवून दोन मारवाडी अर्धा तास चालत घर पर्यत येतं,
झाडावरून चिंच, आंबा,शेंगा,नारळ, पाडायला आजीच्या नात्यातील /आमच्या कुटुंबातील माणसं येत. गुरं न्यायला एखादा पोरगा येई, जात्यावर दळण दळयला गावातील बायका येतं, घरं, अंगण, सारवायला आईला मदत करायला आईच्या मैत्रिणी येत. मळ्यातील भाज्या घरपोच येत,
माझ्या आठवणीप्रमाणे लहानपणापासून दारावर मासेवाले, आणि आदिवासी बायका शेलफिश घेवून दररोज येतं
दरवर्षी लाकडं तोडायला लाकुडतोडे येत त्यांचे चेहरे राकट खांद्यावर कुर्हाडी आणि उन्हात फिरल्याने रंगाने काळपट दोन ते तीन दिवस लाकुड तोडण्याचे काम चाले.सकाळपासून संध्याकाळ पर्यंत लाकड तोडताना त्यांना दोन वेळचा चहा आणि जेवण लागे.
आमच्या घरी माणसांचा राबता, ओळखीचे, अनोळखी एक दोन नाही 15-20मणस शेतात राबायला पण आम्ही कधीच त्यांना घाबरलो नाही. मोठ्या माणसांनी कधी पूढे येवू नका असा दम भरला नाही. वडिल मोठ्या प्रेमाने ही माझी छोटी मुलगी म्हणून आगदी त्या आदिवासी माणसांना,लाकुडतोडयंना ओळख करून देत.
त्या आठवणी होत्या. संस्कार होते, त्याच प्रकारे जोडलेली माणसे होती. बधीलकी होती. आम्हाला कधी कसली भिती वाटली नाही कारण आम्ही रानच पाखरे होतो. आमची कधी कुणीही छेड काढली नाही. मस्ती केली नाही. घरी येणारा माणूस प्रामाणिक आणि काम भलं आणि आपण भले अशा वृत्तीची लोक होती.
क्रमशः
वर्षा पाटील ©®🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा