चहा :(4)



मी लहान असताना आमच्याकडे गायी म्हशींनी भरलेला गोठा होता. तेव्हा लहानपणी चहा पिणं निषिद्ध.पण शेतावर काम करणाऱ्या लोकांसाठी खूप मोठ्या पातेल्यात चूलीवर गुळाचा चहा उकळत असे. (गूळाची मोठी ढेप २५ कि तरी असेल, दुकान वाला डोक्यावर आमच्या घरी घेवून येत असे.)त्या काळ्याकुट्ट चहाला गाळून अर्ध दूध टाकून एका किटली भरला जात असे व शेतावर एखाद्या माणसाकडून रवाना होत असे मग मोठ्या ताटात पेले मांडून घरात असलेल्या माणसांची मोजणी करून ते भरून घरभर ताट फिरवून प्रत्येक जण आपापला पेला उचलून रिकामे ताट उरलेल्या चहाच्या टोकावर विराजमान होत असे. पण काळा चहा प्यायल्यावर आपण काळे होतो म्हणून प्यायचा नाही हे सांगितलेले असे पण चहाचा तो सकाळ ,संध्याकाळ सोहळा पाहण्यात गंमत असे चहा बनवणे ते पेल्यात भरणे. हे सर्व माझी आजी करत असे व मोठी भांवड वाटत असत. पण नुकतीच बालवाडीत जाणारी मी घरातील सर्व माणसं मोजण्याचे काम करत असे.
             पुण्याला माझ्या आईचा मामा व मामाशी लग्न केलेली आत्या रहात असे. माझी आई भांवडात मोठी त्यामूळे मामा व आत्याला जवळची होती. आई मला पुण्याला त्यांच्या कडे एस टी ने घेवून गेली.. पोहचे पर्यंत रात्र झाली व मी पेंगळून गेले. सकाळी आत्या आजीनी  दात घासायला पावडर  दिली अंघोळ करून चूलीपाशी आईबरोबर गप्पा मारता मारता ती चहा करू लागली आता मला नक्की चहा मिळणार होता. कारण पाहुणे म्हणून गेल्यावर हट्ट लाड होत नसतात. पण त्या आत्या आजीनी मला एक नविनच पदार्थ खाउ घातला केळ साखर आणि दूध घरच्या केळयाचे शिकरण. (आमच्या घरी खोलीभर केळ्यांचे घड निघत पूढे त्याच काय होत असे ठावूक नाही. बहुतेक मी झोपलेली असतानाच ती विकली असावीत कारण मला काही केल्या आठवत नाही) मला केळयाचे शिकरण खूपच आवडला पण चहा प्यायची संधी हुकली. 
          सुट्टीत परत पुण्याला मामाच्या लग्नाला सर्व जण गेलो स्टेशनवर आईचे सख्खे भाऊ (मामा)भेटले. मानाने मला उचलून घेतले व आई निर्धास्त झाली. आगगाडीने माझा प्रथमच प्रवास होता, पळणारी झाडे पहायला गंमत येत होती. आईचे खूप नातेवाईक भेटले. त्यातील अर्धे सख्ख्या मामाकडे यायचे खूप मज्जा केली घरच्या झाडाचे पेरू खाल्ले. हवेत थंडी होती मी स्वेटर घातला होता. मामाने मला मध आणि भाजून कोळसा झालेली लंवग दिली. दुपारी पार रस्त्यावर सायकल चालवत गेलो. आणि तिथे भावाच्या बाहेर च्या देशातून आणलेल्या(हाँगकाँग) टी शर्ट वर जसे पट्टे होते तसेच्या तसे पट्टे असलेला घोडा, गाढव सारखा वेगळा प्राणि पाहिला . अगदी जवळून, आम्ही लहान मुला त्याच्या मागे धावू लागलो. नंतर तो काळे पांढरे पट्टे वाला झेब्रा होता कळल. तसेच पट्टे रस्त्यावर ही होते. (Zebra crossing) 
          शाळा सुरू झाली आणि मी पहिलीत दाखल झाले. आम्हाला कविता होती.१) केळीच्या बागा मामाच्या
                               पिवळ्या घड्यांनी वाकायच्या, 
                              २)  लहान माझी बाहुली,
                                 मोठी तिची सावली  
                              नकटे नाक उडविले,,,,,,    
शेवटची ओळ होती                                          
                             केळयाचे शिकरण करायला गेली.
                            ३) झुकझुक आगीने गाडी
                                धुरांच्या रेषा हवेत काढी
                                मामाच्या गावाला जाऊया
४) सगुणाचे आजीस, पत्र(तुझ्याकडे धारिष्ट्य दूध प्यालो). 
झुकझुक आगीने गाडी कविता शिकविताना दोन्ही वर्ग (अआणि ब) एकत्र केले होते. पाटील बाईंनी प्रश्न विचारला आगगाडी कशावर धावते ६०ते ७० मुलांत मी एकटीने हात वर करून  आगगाडी लोखंडी रूळावर धावते. सांगितले अर्थात मी नुकतीच मामाकडे आगगाडीने जावून आले होते. तेव्हा माझे गाव खेडे होते मुलांना आगगाडी कशी असते ते सूद्धा माहीत नव्हते.मी पहिल्या रांगेत बसत असल्यामुळे बाईंनी मला उचलून टेबलावर बसवले. 
    खूप उशीरा  ३री ,४थीत असताना मी चहा प्यायला लागले. पण चहाची चव मला अतिशय प्रिय आहे. चहा गुळाचा जावून पाढ्रर्या शुभ्र साखरेचे बनू लागला. घरच  अर्ध दुध घालून किंवा पूर्ण दूधाचा  चहा त्याची चव अगदी अप्रतिम अमृततुल्य. 

घरोघरी चहा बनतो तो उत्साहवर्धक असतो .मग  त्यात लिहिण्यासारखे एवढे काय❓चहा हा साधारण लोकांत ही पाहुणचारास वापरण्यात येणारे पेय आहे. पाहुणे म्हणून कुणाकडेही गेलात की सहज चहा समोर येतो. 
शेजारी चुलत काकीकडे मी पुस्तक वाचायला जायची व तासन तास बसत असे. संध्याकाळी त्याच्या चहाच्या वेळी तो कितीही मला नको म्हटले तरी समोर येत असे. 
मैत्रिणी कडे अभ्यासाला गेले की चहा हा होणारच.त्यांच्याकडे ़दुध मिळत नसे ते पावडर पासून दूध बनवून चहा करत चव थोडी वेगळी.एका मैत्रीणीकडे तर चहा बनत नसे.सगळे दूध पीत, पण मला तिची आई पूर्ण दूधाचा चहा बनवून देई. 
        
       खेडेगावात चहाला बुकी म्हणतात(बारीक केलेली पुड) आजकाल खूपच चहाचे नवे नवे ब्रँड बाजारात आलेले आहेत पूर्वी कागदात पुडी बांधून मिळत असे. आमच्या शेजारी एका मैत्रीणीचे बाबा मला सांगत आम्ही काही तूमच्या सारखा चुलीवर किंवा स्टोव्ह चहा नाही बनवत आम्ही पाण्यात बुकी टाकतो. ते पाणी पितो मग दुधात साखर घालून पितो पोटात ते एकत्र होवून चहा तयार होतो. गंमत म्हणजे मला ते खर वाटायचं पण ते मला  गंमत म्हणून असे सांगायचे. 
           आमच्या गावाशेजारी .मोठा ओ. एन. जी. सी. प्लॅन्ट आहे. तिथे ठेकेदार कामास लागणारी माणसे आणत. व ती रस्त्या शेजारी झोपड्या बांधून राहत. मी काँलेज मध्ये असेन. आमच्या बाजूच्या शेतात १वर्षाच्या करारावर जागा घेवून व झोपड्या बांधून ती लोक रहात होती. पण त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला.फूकट पाणी कुणी देईना व महाग पाणी ठेकेदाराला परवडत नव्हते. ती लोक आजीला भेटायला आली थोडे पैसे देवू  म्हणाले, आजीने पैसे घेण्यास नकार दिला. पाणी विकू नये म्हणतात. दररोज त्या बायका आमच्या कडे विहीरी चे पाणी नेण्यास येत. मग एकदा तरी आमच्या घरी या म्हणून माझ्या मागे लागत. दिसायलाही काही गोर्या होत्या. एकदा खूपच आग्रह केला म्हणून मी व चुलत बहीण त्यांच्या झोपडीवजा घर पहायला गेलो. बहुतेक ती लोक कर्नाटकातील होती. झोपडी लख्ख सारवलेल्या छोट्या पण नीट माडूंन आवरून घेतलेल्या. काही मुले सांभाळत घरी रहात काही नवर्या बरोबर कामाला रोजंदारीवर जात.मी त्यांच्या कडे गेल्याचा त्यांना खूपच आंनद  झाला होता. त्यांनी मला चहाचा आग्रह केला. आम्हीही चांगल्या जातीतील आहेत ,कामासाठी अशा घरात राहतो. गावाला आमचीही मोठी घरे आहेत.  तुम्ही चहा घेतला की आम्ही पाणी भरताना आमच्यावर येणारे दडपण येणार नाही. मलाही स्वच्छ झोपडीत , स्वच्छ पांढर्या शुभ्र कप बशीत चहा प्यायला नकार द्यावासा वाटला नाही. आम्ही दोघींनी कप व बशीत अर्धा अर्धा चहा  प्यालो. 
  
माझी लँब बाजारपेठेत (२००१) होती. बर्याचदा बरेच काम असले की मी जेवायला ही घरी जात नसे. एकदा माझी मैत्री ण मला भेटायला आली. आधी घरी चल म्हणाली नेमके दुपारी व्हिजीटला  बाहेरून येणारे डाँ. आले नाहीत. माझी गाडी होती. माझ्या घरी जाण्यापेक्षा गप्पा मारायला म्हणून आम्ही तिच्या घरी गेलो. तीही जेवली नव्हती तिच्या आईने  दोघींना जेवण वाढले. दुसर्या दिवशी संध्याकाळी परत आली. हातात धर्मास घेवून,चहा घेवून! मी म्हटलं अग कशाला? मी घरून घेवून येईन पण ऐकेना १महिना मला लँबवर चहा घेवून आली मी म्हटलं तू एक काम कर तू मला सहाय्यक म्हणून लँबमध्ये ये. नाही मी मुंबई ला नोकरीला परत join होते म्हणाली. मला तिच वागणं उलघडल नाही. पण बाजारपेठेत चहा कुठेही मिळतो. चहा पिण्यासाठी गाडीवर मी घरी ही जावू ़शकत होती. तरी ती मला चहा घेवून यायची  मला चहा आवडतो. कारण तो चवदार, उबदार, तर आहेत पण नात्याची गुंफण करण्यात दमदार ही आहे.......... 
Let's have a tea. 

Varsha patil. ©
Bsc(micro) DMLT. 
Uran (Navi mumbai) 
39/5/20
12:10am

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4