पैका(पैसा) भाग 1
गण्या आपल्या म्हाताऱ्य आजी सोबत समुद्र किनारी एका खोपटात(खोपट-ताडाच्या ताडपत्री /माडाच्या झावळयाने बांधलेलं घर जे मातीने पूर्ण शाकारलेले असते. ) रहात असे, डोक्याला ऊन म्हणून साधा फडका कधी बांधत नसे की पायात चप्पल काय असते ते माहीत नसे, असेच कधी छोटा असताना त्याचे आई वडील गेले, आणि गण्या आजीच्या ओटीत पडला. आजी शेतात,कधी दळण कांडण करायला गावात जात असे, आणि तिच्या बरोबर ते पोरगं हिंडत असे चालायला लागल्या पासून ते पोरगं आजीने कधी उचलून घेतलं नाही, लहान वयातच त्या पोराने किती रस्ते तुडवले असतील काय माहीती पण त्यामुळे त्याचे पाय फारच मजबूत झाले होते.जन्मताच तो रंगाने कसा होता ते माहीत नाही पण आताच्या घडीला त्याचा रंग फक्त काळा कुळकुळीत चमकदार दगड गोट्या सारखाच होता, कारण रखरखीत उन, आणि समुद्राचा खारा वारा. आजी ज्या घरात दळण कांडण करायची त्या घरात एकवेळची जेवणाची सोय नी पसाभर कणी, पीठ मिळायचे, दोघांसाठी ते एका दिवसासाठी पुरेसं असायचे, अशाच कुठल्याशा मास्तराकडे आजी बरोबर दळण कांडण करायला गेला असता, मास्तर खुर्चीत लिखाण काम करीत बसला असता त्यांना छोटया,मोठया कही वस्तू लागत , तेव्हा ते पोरा हे आणून दे, ते आणून दे करताना, त्यांच्या लक्षात आले पोरगं कामात चपळ आहे, आज्ञाधारक आहे, तेव्हा त्यांनी त्या पोराला शाळेला घातलं, आता मास्तर सांगेल तसं ते पोरगं शाळा नावाच्या घरात दररोज जात असे, शाळा खोपटा पेक्षा लयी भारी होती, आजी कामासाठी दररोज पक्क्या घरत जात होती तशी...इथ जमिनीचा ओलवा नव्हता, बाकी सगळा काय कसं करायचा, कसं रावाचा ते मास्तर सांगत असे, मास्तर प्रेमळ होता परत मदत पण करायचा, शाळेत बसायला गोणपाट,पाटी पुस्तक कपडा सगळा मास्तरानीच दिला, मास्तर गोष्ट खुप छान सांगी, गण्याला ते खूप आवडे, आजी पण समुद्रातून जाज (जहाज) जाई तेव्हा, घर आई बाप असं काही बाही सांगे, पण गण्या लक्ष देत नसे, पण मास्तर सांगताना तो कान देवून ऐके, लक्षात ठेवी, मास्तरनी काही विचारले तर आठवून सांगे, पण आई ,बाबा,काका मावशी आत्या ही नाती त्याला समजत नसत लक्षात ठेवले तरी सारखा चुकत असे, आजी नातु हे नातं मात्र तो झटदीशी सांगे आणि मास्तर बरोब्बंर बोलले की कसुनसा हसे.आणखी एक निमकी, पावकी, आधेली, पांउणकी शेर. एक आणा दो आणा, चार आणा आठ आणा, बारा आणा आणि सोळा आणा म्हणजे काय हे त्याला कळत नसे, मुलं हात वरती करून झटकन सांगत आणि ते मास्तर शिकविण्याचा आधीपासून त्या मुलंना माहीती असे, गण्या ला ते सर्व अवघड वाटे, पण इतर सर्वच मुलांना कसं येत ते त्याला समजत नसे?
शाळेच्याजवळ एक माणूस चणे फुटाणे विकी पण ते कसे काय आणतात ते गण्या ला माहीत नव्हते, एकदा त्या माणसा जवळ कुणी नसताना गाण्याने जावून फुटाणे मागितले, त्या माणसाने किती पैशाचे हवेत विचारले, आणि मास्तरही शिकवताना एक पैका, दोन पैका शिकवतात, हे मुलासारखं या माणसाला पण येतं पण आपल्याला येत नाही, तो ओशाळून जावू लागला त्या चणे वाल्याने त्याच्या हातावर चिमूटभर चणे दिले, आणि परत गण्या कसुनसा हसला, पैका काय आहे ते त्याला पहायचे होते पण मास्तरांना विचारायला तो घाबरला,
दहा बारा दिवस झाले असतील एका मुलाचे पैसे वर्गात हरवले, मुलाने सर्वात आधी गण्याला विचारले तू माझे पैसे घेतलेस ना ?गाण्याने मला पैका कसा आसतो ते माहीत नाही सांगितले, त्याने गण्याची पिशवी उपसली,खिसे तपासले, पण गण्याकडे काहीही गवसले नाही, तसा तो मुलगा रडायला लागला गण्याला त्याची दया आली, त्याने त्याला पैसे शोधून देण्याचे आश्वासन दिले पण त्या बदल्यात त्याला पैका कसा असतो ते दाखवायचे सांगितले, गण्याला आजून पैसे काय असतात माहीत नाही हे कळल्यावर त्या मुलाला आश्चर्य वाटले, आणि त्यांनी दाखवायचे वचन दिले,गण्याने आज वर्गात चणे कोण कोण खात होते ते शोधले, मग। जास्त पैशाचे चणे कोणी विकत घेतले ते विचारले, अशी एक दोनच मुले निघाली, मग त्या मुलाने किती पैसे आणले ते विचारून त्या एक दोन मुलात जास्तीची बरोबर शिल्लक कुणाकडे आहे ते शोधले, व त्या मुलाला धमकावून विचारले, घाबरलेल्या मुलाने पैसे चोरल्याचे कबूल करून चण्यासाठी वापरलेले पैसे वगळता बाकीचे पैसे परत दिले, पैसे परत मिळालेल्या मुलानेच सर्व हिशेब केला होता, गण्याने फक्त मोठा असल्याने त्या मुलाला मदत केली होती.
एक पैसा दोन पैसे अशी सर्व नाणी त्या मुलाने गण्याला दाखवली, नाणी पाहून गण्याचे डोळे विस्फारले , ही नाणी चणे फुटाणे विकत आणायला वापरतात, हे गण्याला कळले, पण ही येतात कुठून आणि मिळतात कशी? हे त्या छोट्या मुलाला सुद्धा सांगता आले नाही, पण त्याने त्याच्या वडिलांकडे खूप आहेत सांगितले, व ते मिळवायला कष्ट देखील लागतात, व ते कुणाला असेच द्यायचे नसतात, तसेच हरवायचे देखील नसतात. एवढेच त्या मुलाच्या वडिलांनी सांगितले होते. त्याने आपले पैशे परत मिळाले म्हणून गण्याला बरोबर घेवून चणे विकत घेतले, व दोघांनी चणे खाल्ले. त्या मुलाची उन्हात रापलेल्या, काळ्या गरीब गण्याशी मैत्री झाली होती.
क्रमशः
वर्षा पाटील ©️®️🌹.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा