रानभाजी


   पावसाळा सुरू झाला की पहिल्याच पावसाची शिंपड  सार्या अवनीला हिरवा शालू नेसवते.ना कुठे बियाणे पेरावे लागत, ना खताची  फवारणी करावी लागत. त्या 🌳💚🍏हिरव्यागार  शालुत अनेक औषधी वनस्पती  उगवतात. माणसं त्या नाजुक कोवळ्या पानांची भाजी बनवतात. त्या वनस्पती खाल्ल्या की पावसाळ्यात  अनेक व्याधी जडत नाहीत. 

पावसाळ्यात जवळच असलेल्या डोंगरावरून जरा खाली आलं की आमची वडिलोपार्जित शेती. शेतावर जाण हे, त्या वयातील आमचा आवडता खेळ किंवा निर्सगाने लावलेलं वेड      शनिवारी शाळा सुटली, किं घरी पाटी दप्तर टाकून, चहा पिवून गावातील सर्व मुल मुली हातात पिशवी खरळ किंवा मोठा खिळा घेवून पाले भाजी आणायला जात असू. दुसरा दिवसही त्याच साठी,रविवार सुट्टी चा दिवस पण रविवार म्हणून लोळत न पडता सकाळ सकाळ भाजी खूडायला डोंगरावर जायचेा. पहिल्या पावसातच दगडावर शेवाळ उगवलेली असे, तीला चुकवत सावरत सावरत डोंगरावर चढायचे.आेळखता येतील त्या भाज्या खुडून पिशवीत टाकायच्या. मातीच्या ढेपळाला खरळ किंवा खिळ्याने फोडायचे भाजीची मुळे सुटी करायची व ती पिशवीत भरायची. त्यातील मला ठाऊक असलेल्या काही भाज्या. 

१)कुलू:- लाब नाजूक पात्याची पोपटी हिरव्या रंगाची खाली मुळाजवळ थोडी पांढरट रंगाची कुलू ची भाजी, पाण्यात स्वच्छ धुवून कांदा, मिरची खोबरे टाकून तेलावर  परतून भाकरी चपाती बरोबर  खायला थोड्या गोड चवीची अप्रतिम भाजी लावून उगवणारी नाही आणि बी सापडणार नाही पण हमखास पावसाळ्यात डोंगर भागात सापडणार

२) भांरग :- .खरबरीत पानांची काळपट हिरव्या रंगाची थोडी मोठी पाने. चवीला कडू पोटदुखीवर औषध. मुळ काढताना थोडी कठीण सहज हाताने मुळ  उपटता न येणारी. 

३) टाकळा:-हिरवी छोटी छोटी गोल गोल 🍃 पाने दूरवरून ही पटकन ओळखू येणारी ही सूद्धा कुलाच्या भाजी सारखीच करतात. 

४) करडईची पाने:-ही भाजीही कडवट चवीची भांरग व करडू पटकन वेगळी न करता येण्याजोगी. 

५) कंटाेळी:-वेलीवर छोटी छोटी गोल गोल फळ वरून कारल्याची सारखी खरबरीत,पण चवीला गोड, कोवळ्या फळात, आत पांढर्या बिया  , जून झालीच तर जाड बिया काढून भाजी कादंयावर करायची. 

६)शेवळ:- पहिला पाउस पडला की लगेचच जावून शोधायची मोठ्या पावसात लगेच मोठी होवून छान फुलतात.ब्रावून रंगावर पांढरट टिपके आत एकावर एक आवरण त्या आत पिवळट कळी त्याच खाली पिवळे केशर चवीला छान तितकीच अनेक पदर लपेटून सौदर्यने नटलेली ,मातकच रंगामुळे पटकन नजरेत  न भरणारी ही हाताळताना  काळजीपूर्वक हाताळावी लागते नाहीतर हाताला खाज लागते. भाजी करताना सूद्धा ह्यात भरपूर कांदा, खोबरे, शेंगदाणे काजू, (मासांहारी:खिम्मा, कोलंबी, अंडी, इ.) घालतात, खाज मोडण्यासाठी, चिंच, , चूका, काकड, टाकतात.) ही भाजी सहज बनवता येत नाहीत त्या चा एक सोहळा च असतो. माझ्या आई ची मैत्रीण (आमच्या शेतावर राहणारे एक कुटूंब दरवर्षी सर्व सामान घेवून आईकडून आमटी बनवून न्यायचे. त्यांना माझ्या  आईच्या हातचीच चविष्ट आमटी लागत असे. 

७) चूका:-ही छोटी पान असलेली अतिशय आंबट चवीची भाजी मुद्दाम शेवग्ळाच्या आमटीत टाकतात त्याने तोडांला खाज येत नाही. शेवळ विकणार्या बाईकडे ही भाजी आवर्जुन मिळते. 

८) काकड:--ही सूद्धा एक फळ वर्गीय भाजी आहे. चवीला तुरट आवळ्याचा आकाराचे फळ आत ३-४बिया हिरवट टणक फळ मीठात खारवून वर्षभर साठवून ठेवता येते. माीठात मातकट ब्राउन रंगाचे होते. ह्याच्या शिवाय शेवळाची आमटी होत नाही. ह्यानेही भाजीची खाज मोडली जाते. 

९)  कडूकारिंदे/वळकांदे/:-पावसात उंच झाडाच्या आधारे तान्हे वरवर वाढत जातात. जितके उंच तान्हे  तितके मोठे कारिंदे. मातीत खोलवर खणून कारिंदे  काढावे लागतात. चव गोड काही कडवट. वरूनआकाराने ओबडधोबड, रंगाने काळपट ब्राउन, काप करून  लाकडाची राखाडी लावून चाळणीत ठेवून उकडून खऱ्या रानमेव्याचा स्वाद घेणे.हे बनवणे हाही एक सोहळाच -- म्हणजे खूप वस्तू गोळा करून ती खूप वेळ देवून बनवणे. 

१०) छोटे कारिंदे:/गोडे कारिंदे- हे आकाराने लिंबाएवढे, चवीला कडवट आख्खे उकडून खायचे हे जमिनीत न येता तान्हा झाडाच्या आधारे वरवर चढत जातो व त्यावर ते येतात.मुद्दाम गोड चवीचे  कारिंदे सुकवून पावसाळ्यात त्याची खाण्यासाठी लागवड करतात. 

११) हळदे:-बाधांवर (जमिन खणून, मातीचे मोठे ढेपळे रचून घातलेली भिंत,त्यावर फळझाडे लावून त्यांची मूळे खोल जमिनीत  माती धरून ठेवतात.) पावसाळ्यात येणारी वनस्पती फिक्कट तपकिरी, केसरी रंगाचाी हेही बांधावर येतात.शेताशेजारील भाट(पडीक जमीन) इथेही ह्या वनस्पती आपोआप उगवतात. त्या वनस्पती ओळखण्याची उपजत ज्ञान हवं. लहानपणी शेतावर गेल्यावर वडिल बांधावरून शोधून आणून सोलून खायला द्यायचे. आत मधूर खोबर्या  सारखा मासंल  गर, आमच्या घराशेजारी शेताच्या बांधावर ही येत असतं, घरातील मोठे ओळखून कोयत्याने खणून आणत असत. 

१२) फोफडे/भूईकोट/भूछत्री/मशरूम:-लहानपणी आम्ही त्याला कुत्र्याच्या छत्र्या ही म्हणत असू. पावसाळ्यात रानात,ओल्या लाकडावर कुठेही उगवणारी बुरशी वर्गीय वनस्पती पण काही विषारी ही असतात त्यामुळे नीट निवडून आणावी लागते. मशरूम ही एक रानभाज्या आहे हे किती जणांना माहीत असेल. आता ती बाजारात छान वेष्टनात मिळते. तिची चव, आकार रंग सर्वानाच ज्ञात आहे. 

१३) वागेट:-आणखी एक फळ वर्गीय भाजी दिसायला कंटाेळ्या सारखी पण वरून साल मउ व गुळगुळीत, एकादशीलाच्या दुसऱ्या दिवशी,( बारशीला)भाजी करून खातात. दुर्मिळ होत असल्या कारणाने, एक तरी फळ इतर भाजीत टाकून खावे. वनात श्रीरामाने त्यावरच गुजराण केली होती. म्हणून ते आपल्या पोटात राम म्हणतं व पोटातील विकार नष्ट होतात. ही कथा मला आई सांगे (असं काही बाबी सांगून तिने आम्हाला रानभाज्या खायला शिकवले.) 

१४) आंबाडे:फळ वर्गीय  नुसती फांदी रोवली तरी वाढणारे झाड, खूप मोठा होत. छोटी छोटी फळ, चवीला आंबट मीठात खारवून, मासळीच्या सारात टाकून, नुसती भाजी, किंवा छान वर्षभरासाठी आंब्याच्े लाोणचे करतो तसे लोणचे करून खातात. 

मोठे झाले की त्यातील बी कडक होते, वरच साल पिकाले की रंग पिवळसर होतो. व आत आंबटगोड रसरशीत लगदा. 

१५) अंबाडी:-आंबट चवीची छोटी हिरवी पाने. पण ही अंबाडे ह्या फळाची पाने नव्हेत. 

१६) शेवगा:-ही लांब शेंग असलेली भाजी हल्ली प्रत्येकाच्या दारात दिसते , ह्याच्या पाल्याची भाजी किंवा आमटी ही छान लागते. शेंगा वर्षभर मिळतात. पण खरा बहर हा पावसाळ्यात च असतो. 

जसे आम्ही मोठे होत गेलो. (आमच्या शेतजमिनी सरकारने घेतल्या आम्हाला काहीही फायदा झाला नाही) डोंगर कपारीत फिरण्याचे दिवस लुप्त झाले. पण डोंगरावर राहणार्या जमाती चे (कातकरी,गोंड. इ. )लोक ह्या भाज्या घरी विकायला घेवून यायचे. बाजारात मिळो न मिळो आम्हाला मिळायच्या. ह्यावर्षी लाँकजावून मुळे घरपोच भाज्या आल्या नाहीत. आमचे बाजारात भाज्या शोधून आणणे झाले नाही. व एवढ्या वर्षांत एकही पावसाळी रानभाजी खाल्ली नाही असे झाले नाही. हे पहिलेच वर्ष की रानचा मेवा खाताच आला नाही. 

टीप:मला आठवल्या तेवढ्या भाज्या मी लिहील्या आहेत. काही विस्मरणात गेल्या असतील. नजरेत पडल्या नाहीत. त्यामुळे राहून गेल्यात. 


Varsha patil. ©®

Uran

9819406813

10:30 pm

20/6/20


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4